सिरोंचात फुलविली काळ्या तांदळाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:45 IST2019-05-17T23:45:31+5:302019-05-17T23:45:57+5:30

तालुक्यातील सर्वच शेतकरी पारंपरिक तांदळाची शेती करीत असतानाच सिरोंचा येथील लक्ष्मण राजाबापू पेदापल्ली या २८ वर्षीय पदवीधर युवकाने आपल्या शेतीत काळ्या तांदळाची शेती फुलविली आहे. काळे तांदूळ औषधी गुणधर्मयुक्त असल्याने या तांदळाला पारंपारिक तांदळापेक्षा चांगली किंमत व मागणी मिळत आहे.

Phulval black rice cultivation in Sironchat | सिरोंचात फुलविली काळ्या तांदळाची शेती

सिरोंचात फुलविली काळ्या तांदळाची शेती

ठळक मुद्देनाविन्यपूर्ण उपक्रम : नागरिकांमध्ये प्रचार वाढल्याने मागणी अधिक; शेतकऱ्यांच्या पिकाला भेटी

कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील सर्वच शेतकरी पारंपरिक तांदळाची शेती करीत असतानाच सिरोंचा येथील लक्ष्मण राजाबापू पेदापल्ली या २८ वर्षीय पदवीधर युवकाने आपल्या शेतीत काळ्या तांदळाची शेती फुलविली आहे. काळे तांदूळ औषधी गुणधर्मयुक्त असल्याने या तांदळाला पारंपारिक तांदळापेक्षा चांगली किंमत व मागणी मिळत आहे. सुरूवातीला इतर शेतकऱ्यांनी लक्ष्मणला मुर्खात काढले होते. मात्र त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याच्या शेतीला अनेक शेतकरी भेट देत असून धान लागवडी विषयी माहिती जाणून घेत आहेत.
गोदावरीच्या कुशीत वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या तालुक्यात प्रामुख्याने मिरची, मका, धान, कापूस या चार पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. त्यातही धानाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. धानाची शेती बहुतांश शेतकरी करीत असल्याने धानाला मागणी आहे. मात्र भाव मिळत नाही. परिणामी धानाची शेती दिवसेंदिवस तोट्याचा व्यवसाय बनत चालली आहे. हे अनेक शेतकºयांना समजत असले तरी पारंपारिक व्यवसाय असल्याने या व्यवसायापासून दूर जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.
सिरोंचा येथील लक्ष्मण राजाबापू पेदापल्ली या युवकाने बीसीएचे शिक्षण घेतले आहे. लक्ष्मणला त्याच्या शिक्षणानुसार कोणत्याही खासगी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती, मात्र नोकरीच्या मागे न लागता लक्ष्मणने शेतीतच आपले भाग्य अजमाविण्याचा प्रयत्न सुरू केला.
शेतीत काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते हे महत्त्वाचे आहे. हे तत्त्व लक्षात घेऊन लक्ष्मणने पारंपारिक धानाची लागवड न करता काळे तांदूळ असलेल्या धानाची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने मणिपूर राज्यात जाऊन काळ्या तांदळाची बियाणे आणले. काळ्या तांदळाचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी असल्याने या तांदळाला चांगली किंमत मिळत आहे. लक्ष्मणच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला कुटुंबियांनीही विरोध दर्शविला होता. मात्र धानापासून चांगले उत्पन्न मिळणार असल्याने लक्ष्मणच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
औषधी गुणधर्म
काळे तांदूळ औषधी गुणधर्म असलेले तांदूळ आहे. मधुमेह, कर्करोग रूग्णांकरिता सदर तांदूळ औषधीवर्धक मानले जाते. नागरिकांमध्ये जसजशी प्रचार होत आहे, तसतशी या तांदळाची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे पारंपारिक तांदळापेक्षा या तांदळाला चांगली किंमत मिळत असल्याने शेती नफ्याची होत आहे.

Web Title: Phulval black rice cultivation in Sironchat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.