किडीच्या प्रादुर्भावाने पछाडले
By Admin | Updated: September 27, 2015 00:59 IST2015-09-27T00:59:16+5:302015-09-27T00:59:16+5:30
धान, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

किडीच्या प्रादुर्भावाने पछाडले
शेतकरी संकटात : धान, सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव; हाताशी आलेले पीक गेले
गडचिरोली : धान, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली असून हाताशी आलेले पीक आता हातून जाण्याच्या विवंचनेने बळीराजा त्रस्त झाला आहे. यंदा पावसाने दगा दिल्यानंतरही शेतकऱ्याने कशीतरी रोवणी केली होती. परंतु धानपीक आता किडीमुळे पूर्णत: नष्ट झाले आहे. काही ठिकाणी पिकांमध्ये गुरांना चरण्यासाठी सोडून दिले आहे.
जिल्ह्याच्या वडसा तालुक्यांमध्ये सावंगी, कोंढाळा, उसेगाव, तुळशी, विसोरा, शंकरपूर, कोकडी, फरीझरी, एकलपूर, चोप कोरेगाव, धानोरा तालुक्यातील चातगाव, कन्हाळगाव, खुर्सा, गिलगाव, बेडगाव, मुरमाडी, मुरूमबोडी, रांगी, मोहली, खेडी, सोडे, लेखामेंढा, पांढरसडा, दुधमाळा, आरमोरी तालुक्यातील कासवी, वैरागड, ठाणेगाव, सुकाळा, मोहझरी, शिवणी, मेंढेबोडी, करपळा, सिर्सी, देऊळगाव, शेगाव, डोंगरगाव, लोहारा, कोजबी, गणेशपूर, पेवठी (नवरगाव), इंजेवारी, गडचिरोली तालुक्यात अडपल्ली, गोगाव, माहदवाडी, कुराडी, चुरचुरा, नवरगाव, धुंडेशिवणी, कळमगाव टोला, पिपरटोला, अमिर्झा, चांभार्डा या भागासह दक्षिण व उत्तर गडचिरोली भागातील अनेक तालुक्यांमध्ये धानावर गादमाशी, खोडकीडा, करपा, लष्करीअळी, पाने गुंडाळणारी अळी, बेरडी, कडाकरपा या रोगांचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाअभावी आधीच विलंबाने झालेली धानाची रोवणी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात किडीचा झालेला प्रादुर्भाव यामुळे संपूर्ण नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
किड नियंत्रणासाठी शेतकरी पिकावर फवारणी करीत असले तरी त्याचा प्रभाव दिसूनच येत नाही, अशी माहिती या भागाचा दौरा करून आलेल्या लोकमत चमुला अनेक शेतकऱ्यांनी बोलताना दिली.
यंदा विलंबाने आलेला पाऊस यामुळे दुष्काळी परिस्थिती होतीच परंतु त्यातही हाताशी आलेले पीक आता जात असल्याने शेतकऱ्याची स्थिती आता मोडण्याच्याच अवस्थेत असल्याचे आरमोरी, वडसा, धानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कृषी विभागाचे अधिकारी आमच्या गावाकडे येऊन गेले. त्यांनी पिकांची पाहणी केली. परंतु त्यानंतर सांगितलेले उपाय केल्यानंतरही किड कमी झाली नाही, अशी माहिती शंकरपूर येथील शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
वडसा, आरमोरी तालुक्यात का आली कीड?
वडसा, आरमोरी तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्पाचे पाणी वापरून उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले. उन्हाळी धानाचे पीक साधारणत: मे, जून महिन्यात काढणीला काढण्यात आले. त्यानंतर लगेचच खरीप हंगामासाठी मशागत सुरू झाली. या कालावधीत बांधीमध्ये पाणी असल्याने गवत व जुन्या धानाची देठ कायम होती. त्यामुळे प्रमुख किडीचा जीवनक्रम सतत चालू राहील. परिणामी खरीप हंगामामध्ये किडीच्या वाढीकरिता पोषक असे वातावरण तयार होऊन या भागात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हे एक प्रमुख कारण असल्याचे सोनापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. सुधीर बोरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
उशिरा रोवणीमुळे बेरडीचे आक्रमण
गडचिरोली जिल्ह्यात यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला. उशिरा धानाची लागवड झाली. धानपीकाची रोवणी जेवढी उशीरा व धान रोवणीला लागणाऱ्या पऱ्ह्यांचा कालावधी जर ५० ते ६० दिवसांचा असेल तर अशा ठिकाणी हमखास बेरडी व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. हीच परिस्थिती यंदा गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे बेरडीचेही प्रचंड आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे.