२०० रूपये दंड भरा, जिल्ह्यात प्रवेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:01:02+5:30
बाहेरून विनापरवाना येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक सीमांवर नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस नियुक्ती असते. तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्यास संबंधित व्यक्तीकडून ५ हजार रूपये दंड व ज्या वाहनाने प्रवेश करेल त्या वाहनावर एक लाख रूपये दंड ठोठावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

२०० रूपये दंड भरा, जिल्ह्यात प्रवेश करा
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात विनापरवाना प्रवेशास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. मात्र देसाईगंज तालुक्यातील नाक्यांवरून केवळ २०० रूपये दंडाची पावती भरून खुशाल प्रवेश मिळत आहे. महसूल विभागाच्या या कारनाम्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात बाहेरून आलेल्या रूग्णांमुळेच कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे बाहेरून विनापरवाना येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक सीमांवर नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस नियुक्ती असते. तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्यास संबंधित व्यक्तीकडून ५ हजार रूपये दंड व ज्या वाहनाने प्रवेश करेल त्या वाहनावर एक लाख रूपये दंड ठोठावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
देसाईगंज तालुक्याला गोंदिया, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमधून देसाईगंज तालुक्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी पोलीस व महसूल विभागातर्फे चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. विनापरवाना प्रवेश करणाºयावर याच चेकपोस्टमार्फत २०० रूपये दंड ठोठावून सोडून दिले जात आहे. विशेष म्हणजे २०० रुपये भरा व प्रवेश करा, असे धोरण या ठिणावरून सुरू झाले असल्याने अवैध प्रवेश करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. २०० रूपये दंड भरून याच मार्गाने अधिकारी, कर्मचारी दररोज ये-जा करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही पायदळी तुडविला जात आहे.
थकबाकीच्या नावाखाली दंड
दंड ठोठावण्यात येत असलेल्या व्यक्तीला पावती दिली जात आहे. या पावतीवर गाव नमुना-९ असे लिहिण्यात आले आहे. थकबाकी म्हणून २०० रूपये वसूल केले जात आहेत. या पावतीवर नेमके २०० रूपये वसुलीचे कारण सांगण्यात आले नाही. तसेच शिक्कासुद्धा मारला जात नाही. केवळ सही केली जाते.
चेकपोस्टवर महसूल विभागातर्फे बुक ठेवण्यात आले आहे. या बुकमधील पावत्या दंड वसुलीसाठी वापरल्या जात आहेत. याबाबत तक्रारी होत असल्याने त्या पावत्या देणे बंद करण्याचे निर्देश देणार आहे.
- दीपक गुट्टे,
तहसीलदार, देसाईगंज