शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:21+5:302021-03-17T04:37:21+5:30
मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शासनमान्य माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळेतील मान्यताप्राप्त कार्यरत शिक्षकांना वेतनश्रेणी, निवडश्रेणी मंजूर करण्यासाठी पात्र ...

शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा
मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शासनमान्य माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळेतील मान्यताप्राप्त कार्यरत शिक्षकांना वेतनश्रेणी, निवडश्रेणी मंजूर करण्यासाठी पात्र असलेल्या शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी लाभापासून वंचित होते. शिक्षकांचे प्रस्ताव शाळा मुख्याध्यापकाकडून वरिष्ठ लेखाधिकारी शिक्षण विभाग यांच्याकडे पाठविण्यात आले होते. परंतु त्यांना सेवांतर्गत प्रशिक्षण पुढे करून या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणीपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक लाभ मिळाला नव्हता. आता शासनाने विद्या प्राधिकरण अंतर्गत शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे आदेश दिल्यामुळे सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यामार्फत शाळा मुख्याध्यापकांकडून मागण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या वर्षीपासून संबंधित शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणीसाठी पात्र होते त्या वर्षीपासून शिक्षकांना देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना देसाईगंज संघटनेतर्फे करण्यात आली आहे.