धानाेरा : मुरूमगाव ते औंधी या ९ किमी मार्गाचे खडीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. या मार्गाचे खडीकरण लवकर करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मुरूमगाव ते औंधीपर्यंतचे अंतर १२ किमी आहे. औंधी हे गाव सीमेलगत असल्याने दाेन्ही राज्यातील नागरिक याच रस्त्याने ये-जा करीत असतात. मुरूमगाववरून छत्तीसगडची सीमा केवळ पाच किमी अंतरावर आहे. परंतु या मार्गाचे अद्यापही खडीकरण न झाल्याने येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे खडीकरण तसेच डांबरीकरण झाल्यास परिसरातील नागरिकांना छत्तीसगड राज्यात ये-जा करणे साेयीचे हाेईल. तसेच व्यावसायिकांना आपला माल छत्तीसगड राज्यात विक्रीसाठी नेता येईल. त्यामुळे या मार्गाचे खडीकरण करावे तसेच नदी व नाल्यांवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.