अल्पवयीन मुलीला वाहन देणाऱ्या पालकास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:26 IST2019-07-08T22:25:43+5:302019-07-08T22:26:05+5:30
अल्पवयीन मुलीला वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकाला गडचिरोलीचे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी २ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अल्पवयीन मुलीला वाहन देणाऱ्या पालकास दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अल्पवयीन मुलीला वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकाला गडचिरोलीचे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी २ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
साहेबराव मोनाजी वाकोडे रा. रामनगर गडचिरोली असे शिक्षा झालेल्या पालकाचे नाव आहे. साहेबराव यांनी अल्पवयीन मुलीला दुचाकी वाहन चालविण्यास दिले. या वाहनाची कागदपत्रे सुध्दा नव्हती. सदर अल्पवयीन मुलीने वाहनावर ट्रिपल सिट बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता, अशी फिर्याद गडचिरोली वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारी लक्ष्मीछाया तांबूसकर यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार २१ नोव्हेंबर २०१८ रोजी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आत्माराम गोन्नाडे यांनी केला. या प्रकरणाचा निकाल ८ जुलै रोजी लागला आहे. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी अल्पवयीन मुलीच्या पालकाला भादंवि कलम २७९, १०९ अन्वये एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा करावास, कलम ३३६, १०९ अन्वये २५० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास, मोटार वाहन कायदा कलम १४६, १९६ अन्वये एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे तत्कालीन सहायक सरकारी अभियोक्ता महाजन यांनी काम पाहिले.
पालकांना धडा
अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देतात. अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र याचे उल्लंघन केले जाते. न्यायालयाच्या या निकालामुळे अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास देणाºया पालकांना धडा बसला आहे.
वाहतूक पोलिसांची धडक मोहीम
शाळा सुरू झाल्याने अल्पवयीन मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. याला प्रतिबंध बसावा यासाठी गडचिरोली पोलीस वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.