लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील चार कोटी रुपयांच्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणात १९ एप्रिल रोजी पहाटे उपप्रादेशिक व्यवस्थापक एम.एस. बावणे यांच्यासह १७ जणांवर गुन्हा नोंद झाला. यानंतर आता बावणे यांना दुसरा धक्का बसला आहे. २१ एप्रिल रोजी व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेद्वारे केलेल्या धान खरेदीत २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये मिळून तब्बल दहा हजार क्विंटलची तफावत आढळली होती. शिवाय ३४ हजार ६०१ बारदाना कमी आढळून आला होता. दोन्ही वर्षात एकूण ३ कोटी ९५ लाख रुपयांचा गैरव्यवहार उजेडात आल्याने कुरखेडा ठाण्यात उपप्रादेशिक व्यवस्थापक एम.एस. बावणे, विपणन अधिकारी सी. डी. कासारकर, एच.व्ही. पेंदाम व संबंधित अध्यक्ष, सचिव संचालक अशा एकूण १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. तथापि, व्यवस्थापकीय संचालकांनी उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांना निलंबनाचा दणका दिला.
ठावठिकाणा लागेनागुन्हा नोंद होताच पोलिसांनी दोन विपणन अधिकाऱ्यांना जेरबंद केले. उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे यांच्यासह उर्वरित आरोपी फरार आहेत. अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून पोलिसांकडून शोध सुरू आहे.