बारदान्याअभावी केंद्रावरील धान खरेदी बंद
By Admin | Updated: December 22, 2014 22:47 IST2014-12-22T22:47:12+5:302014-12-22T22:47:12+5:30
आदिवासी विकास महामंडळामार्फत २८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या २८ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली. मात्र महामंडळामार्फत

बारदान्याअभावी केंद्रावरील धान खरेदी बंद
अहेरी : आदिवासी विकास महामंडळामार्फत २८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या २८ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली. मात्र महामंडळामार्फत या संस्थांना केंद्रांवर पुरेसा बारदाना उपलब्ध करून देण्यात न आल्याने अहेरी शहरातील केंद्रासह तालुक्यातील अनेक केंद्रांवरील धान खरेदी बंद आहे. यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची अडचण प्रचंड वाढली आहे.
अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्यावतीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. सुरूवातीला चार ते पाच दिवस या केंद्रावर धान खरेदी करण्यात आली. मात्र बारदाना संपल्यामुळे या केंद्रावरील धान खरेदी ८ डिसेंबरपासून बंद आहे. अहेरी तालुक्यात आदिवासी विकास महामंडळांतर्गत मागील वर्षी एकूण ३१ संस्थांमार्फत ३१ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात २२ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ६ केंद्रांना मंजुरी दिली. आता एकूण २८ धान खरेदी केंद्र धान खरेदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र ८ डिसेंबरपासून अहेरी शहरासह तालुक्यातील अनेक केंद्रांवर बारदाना उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्रांवरील धान खरेदी बंद आहे. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे नाईलाजास्तव कवडीमोल भावात धान्य विकावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
बारदाना अभावी धान खरेदी बंद असल्याने अनेक शेतकरी केंद्रावर विक्रीसाठी आणलेले धान घेऊन परत जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा त्रासह वाढला आहे. परत जाणाऱ्या शेतकऱ्यांना भाड्याच्या वाहनातून खासगी व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी धान्य न्यावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भूर्दंड बसत आहे. आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीसाठी तत्काळ बारदाना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे पदाधिकारी अब्बाज बेग यांनंी केली आहे. (शहर प्रतिनिधी)