खरीप हंगामात ६५ कोटींची धान खरेदी
By Admin | Updated: January 28, 2017 01:14 IST2017-01-28T01:14:01+5:302017-01-28T01:14:01+5:30
आदिवासी विकास महामंडळांतर्गत विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात

खरीप हंगामात ६५ कोटींची धान खरेदी
८४ केंद्रांवर आवक : आदिवासी विकास महामंडळातर्फे
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात आतापर्यंत एकूण ८४ केंद्रांवरून ६५ कोटी ५१ लाख ३१ हजार ७६८ रूपये किमतीच्या ४ लाख ४५ हजार ६६७ क्विंटल इतकी धानाची खरेदी झाली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत पाचही उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दित यंदाच्या खरीप हंगामात एकूण ५८ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी ५५ केंद्र सुरू झाले असून या सर्वच केंद्रावर धानाची आवक वाढली आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५५ केंद्रांवरून आतापर्यंत ४६ कोटी ८८ लाख ३० हजार ७१६ रूपये किमतीच्या ३ लाख १८ हजार ९३२ क्विंटलची धान खरेदी झाली आहे. तर अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एकूण ३३ केंद्र मंजूर करण्यात आले. यापैकी ३२ केंद्र सुरू झाले असून २९ केंद्रांवर धानाची आवक झाली आहे. या केंद्रांवरून आतापर्यंत १८ कोटी ६३ लाख १ हजार ५२ रूपये किमतीच्या १ लाख २६ हजार ७३५ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयातर्फे हद्दित आंधळी, कढोली, कुरखेडा, खरकाडा, सोनसरी, गेवर्धा, नान्ही, शिरपूर, गोठणगाव व पलसगड असे १० केंद्र सहकारी संस्थांच्या वतीने सुरू करण्यात आले. सदर १० धान खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत १२ कोटी ५५ लाख २५ हजार ८२८ रूपये किमतीच्या ८५ हजार ३९१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्वाधिक गोठणगाव केंद्रावर १२ हजार १९६ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.
कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मसेली, कोरची, बेतकाठी, बोरी, मर्केकसा, बेडगाव, बोगाटोला, कोटगुल, रामगड, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा, गॅरापत्ती, चरवीदंड व येंगलखेडा आदी १५ केंद्रांवरून ११ कोटी ९२ लाख ३४ हजार रूपये किमतीच्या ८१ हजार १११ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण १० केंद्रांवरून ८ कोटी ८० लाख १४ हजार ६९१ रूपये किमतीच्या ५९ हजार ८७३ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१० केंद्रावर गोदाम तसेच ओट्याच्या व्यवस्थेचा अभाव
आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या जिल्ह्यात एकूण ८४ धान केंद्रावर धानाची आवक वाढली आहे. मात्र यापैकी १० केंद्रावर गोदाम तसेच ओट्यांची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित सहकारी संस्थांच्या वतीने या केंद्रांवर उघड्यावरच धान खरेदी करून सदर धान उघड्यावरच ठेवले जात आहे. मागील तीन-चार वर्षात ताडपत्री झाकून उघड्यावर धान ठेवण्यात आल्यामुळे अनेक केंद्रांवर धानाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गतवर्षीपासून उघड्यावर धान खरेदी करायची नाही, असे निर्देश संस्था तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाला दिले होते. यंदाच्या खरीप हंगामात उघड्यावर धान खरेदी सुरू असलेल्या केंद्रामध्ये कोरची तालुक्यातील कोटगुल, धानोरा तालुक्यातील सोडे, चातगाव, दुधमाळा, येरकड, सावरगाव तसेच घोट परिसरातील सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी बि. व गिलगाव या १० केंद्रांचा समावेश आहे.
२५ कोटींचे धान चुकारे प्रलंबित
आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने जिल्ह्यात एकूण ८४ केंद्रांवरून ४ लाख ४५ हजार ६६७ क्विंटलची धान खरेदी करण्यात आली. यापोटी धान चुकाऱ्याची एकूण रक्कम ६५ कोटी ५१ लाख ३१ हजार ७६८ रूपये होते. यापैकी ४० कोटी ३५ लाख ६० हजार रूपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. अद्यापही ४ हजार ६२४ शेतकऱ्यांचे २५ कोटी १५ लाख ७१ हजार २२ रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहे. यामुळे धान विक्री केलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत.