गडचिरोलीत आज महारक्तदान शिबिराचे आयाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST2021-07-02T05:00:00+5:302021-07-02T05:00:24+5:30
पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस कॉलनीजवळच्या पोलीस हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहतील.

गडचिरोलीत आज महारक्तदान शिबिराचे आयाेजन
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि.२ जुलै रोजी गडचिरोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस कॉलनीजवळच्या पोलीस हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहतील.
या शिबिरात रक्तदान करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह गडचिरोली शहरातील आणि परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत नागरिक सरसावत आहेत. गडचिरोलीनंतर जिल्ह्याच्या इतर भागात रक्तदान शिबिर होणार आहे.
पोलीस हॉस्पिटलमध्ये सकाळी १० वाजतापासून सुरू होणाऱ्या या शिबिराच्या तयारीसाठी जिल्हा पाेलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. शारीरिक अंतर आणि मास्क यासारख्या कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी मास्क लावूनच यायचे आहे. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाची चमूही उपस्थित राहणार आहे.
रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र व कार्ड
या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू रक्त संकलनासाठी येणार आहे. ऐच्छिक रक्तदान करणाऱ्या या शिबिरातील सर्व रक्तदात्यांना रक्तपेढीकडून प्रमाणपत्र आणि रक्तदानाचे कार्ड मिळणार आहे. गरजवंताला रक्त देण्यासाठी ते कार्ड उपयुक्त ठरणार आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे. सामाजिक दायित्वातून जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदानाच्या महान कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस विभागासह लोकमत परिवाराने केले आहे.