अवघडच्या सुधारित यादीशिवाय बदलीस शिक्षकांचा विराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:53+5:302021-04-21T04:36:53+5:30
गडचिराेली : अवघड व महिला प्रतिकूल क्षेत्रातील गावांची सुधारित यादी जाहीर केल्याशिवाय शिक्षक बदलीची प्रक्रिया राबविण्यास शिक्षकांनी विराेध दर्शविला ...

अवघडच्या सुधारित यादीशिवाय बदलीस शिक्षकांचा विराेध
गडचिराेली : अवघड व महिला प्रतिकूल क्षेत्रातील गावांची सुधारित यादी जाहीर केल्याशिवाय शिक्षक बदलीची प्रक्रिया राबविण्यास शिक्षकांनी विराेध दर्शविला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी शासनाने ७ एप्रिल राेजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. यात सुधारित धाेरण निश्चित करण्यात आले आहे. परिशिष्ट १ मध्ये अवघड क्षेत्राचे निकष नमूद आहेत. अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी समिती गठित करायची आहे. दर तीन वर्षांनी या समितीचे पुनर्विलाेकन करण्याच्या सूचना आहेत. महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत व सध्या दुर्गम भागात महिला शिक्षिका कार्यरत असल्यास त्यांना बदलीचा अधिकार प्राप्त हाेणार आहे.
गडचिराेली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात अवघड व महिलांसाठी प्रतिकूल अनेक गावे आहेत. या गावांमध्ये आपली बदली हाेऊ नये, यासाठी अनेक पुरुष शिक्षक धडपडत राहतात. या गावांमध्ये काही महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार दर तीन वर्षांनी सुधारित यादी तयार करणे आवश्यक आहे. ही यादी तयार झाल्यानंतरच बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकावरी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.