उघड्यावरील धान भिजले
By Admin | Updated: May 18, 2015 01:41 IST2015-05-18T01:41:20+5:302015-05-18T01:41:20+5:30
येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या कुलकुली, देलनवाडी, दवंडी व वडेगाव ...

उघड्यावरील धान भिजले
गोदामाचा अभाव : आदिवासी विकास महामंडळाला लाखोंचा फटका
आरमोरी : येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या कुलकुली, देलनवाडी, दवंडी व वडेगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या केंद्रात गोदाम व्यवस्था नसल्याने खरेदी केलेल्या उघड्यावरील धानाला शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. अवकाळी पावसाने महामंडळाचा लाखो रूपयांचे धान भिजल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या वतीने केंद्रांवरून दरवर्षी धानखरेदी केली जाते. मात्र केंद्राच्या परिसरात गोदामाची व्यवस्था नसल्याने संपूर्ण धान उघड्यावर ठेवल्या जाते. याशिवाय खरेदी करण्यात आलेल्या धानाचे महामंडळाच्या वतीने लवकर उचल करण्यात येत नाही. त्यामुळे दरवर्षी अवकाळी पावसाचा फटका बसतो. शासन व प्रशासनाच्या वतीने धान साठवणुकीसाठी गोदाम व्यवस्था करण्यात न आल्याने महामंडळाला दरवर्षी नुकसानीच्या माध्यमातून लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागतो. घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत अनेक सहकारी संस्थामार्फत खरेदी करण्यात आलेले धान अद्यापही उघड्यावर आहेत. (प्रतिनिधी)
४१ हजार क्विंटल धान्याची खरेदी
महामंडळाच्या आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध सहकारी संस्थामार्फत वडेगाव, दवंडी, उराडी, अंगारा, पिंपळगाव, देलनवाडी व कुलकुली आदी केंद्रावर आतापर्यंत एकूण ४१ हजार २५८ क्विंटल धान्य खरेदी करण्यात आली. यापैकी अर्धे अधिक धान उघड्यावर ठेवण्यात आले होते. धान पावसाने भिजल्यामुळे नुकसान झाले.