विद्युत जनित्र उघडेच; धोक्याची शक्यता
By Admin | Updated: June 28, 2014 00:48 IST2014-06-28T00:48:23+5:302014-06-28T00:48:23+5:30
धानोरा तालुक्यातील धानोरा, सोडे, मोहली, कन्हाळगाव व रांगी या परिसरातील अनेक गावातील विद्युत जनित्र पेट्याच्या झाकणाअभावी उघडेच आहे.

विद्युत जनित्र उघडेच; धोक्याची शक्यता
रांगी : धानोरा तालुक्यातील धानोरा, सोडे, मोहली, कन्हाळगाव व रांगी या परिसरातील अनेक गावातील विद्युत जनित्र पेट्याच्या झाकणाअभावी उघडेच आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
रांगी येथील शासकीय रूग्णालयाच्याजवळील विद्युत जनित्र गेल्या अनेक दिवसांपासून उघडे आहेत. सदर विद्युत जनित्राच्या ठिकाणी नवीन पेट्या लावण्यात याव्या, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. विद्युत जनित्र उघडे असल्यामुळे या ठिकाणी लहान मुले, पक्षी यांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, नवीन विद्युत पेट्या उपलब्ध झाल्यावर त्या लावण्यात येतील. मात्र गेल्या चार महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा नवीन पेट्या लावण्यात आल्या नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी शॉटसर्कीट होऊन जिवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धानोरा तालुक्यात सर्वेक्षण करून उघड्या असलेल्या विद्युत जनित्राच्या ठिकाणी तत्काळ नवीन पेट्या लावून त्या सुरक्षित करण्यात याव्या, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
असेच चित्र जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये आहे. विद्युत जनित्राच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण व जुन्याच पेट्या आहे. या पेट्यांचे झाकण पूर्णत: गंजले असून खराब झाले आहे. लहान मुले या ठिकाणी खेळत असतांना हात लावण्याचा प्रयत्न करू शकतात. परिणामी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तत्काळ नवीन पेट्या लावण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)