दोन महिन्यांत २० हजार नागरिकांचे खाते उघडा

By Admin | Updated: November 19, 2016 01:53 IST2016-11-19T01:53:54+5:302016-11-19T01:53:54+5:30

एटापल्ली उपविभागात एकूण कुटुंबांची संख्या ४१ हजार ४३ एवढी आहे. मात्र केवळ १४ हजार २७३ कुटुंबाकडे बँक खाते आहेत.

Open the account of 20 thousand citizens in two months | दोन महिन्यांत २० हजार नागरिकांचे खाते उघडा

दोन महिन्यांत २० हजार नागरिकांचे खाते उघडा

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : भामरागड, एटापल्ली तालुक्यात केवळ ३५ टक्के नागरिक बँकसेवेशी जुळले
गडचिरोली : एटापल्ली उपविभागात एकूण कुटुंबांची संख्या ४१ हजार ४३ एवढी आहे. मात्र केवळ १४ हजार २७३ कुटुंबाकडे बँक खाते आहेत. उर्वरित कुटुंबांचे बँक खाते काढण्यासाठी मोहीम उघडली जाणार आहे. यासाठी गावातील कोतवाल व रोजगार सेवकांची मदत घेण्याचा निर्णय आढावा सभेत घेण्यात आला. येणाऱ्या महिनाभरात एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्यांमधील नागरिकांचे खाते उघडण्यासाठी बँकांचे कर्मचारीही सहकार्य करतील. दोन महिन्यात बँकांनी २० हजार नागरिकांचे खाते उघडावे, असे निर्देश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी शुक्रवारी दिले.
शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात गटस्तर समितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रकल्प अधिकारी बाबरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक अरूणकुमार, लिड बँकेचे व्यवस्थापक एस. आर. खांडेकर, बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक शांतीलाल सेता, नाबार्डचे व्यवस्थापक कोल्हे आदींसह स्थानिक बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक म्हणाले की, गावपाड्यांवर नागरिकांना आर्थिक व्यवहार बँकेच्या मार्फतीने करता यावे, यासाठी सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. देशभरात एकूण अडीच लाख सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यातील एक सेवा केंद्र एटापल्लीत सुरू आहे. या सेवा केंद्राची उलाढाल दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अशा केंद्रांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यावर भर दिल्यास बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल.
बँकेचे नाव व आधार क्रमांक यांच्या मदतीनेही आर्थिक व्यवहार करणे शक्य झाले आहे. या केंद्रांना खाते उघडणे, वित्त सहाय्य करणे आदींचेही अधिकार दिले आहेत. एटापल्ली बचत गटांनीही याच सेवा केंद्राच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करावे, यासाठी बँकांनी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Open the account of 20 thousand citizens in two months