मुस्लिम आरक्षणासाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय
By Admin | Updated: January 14, 2015 23:08 IST2015-01-14T23:08:46+5:302015-01-14T23:08:46+5:30
राज्यातील मुस्लिम समाज सर्व दृष्टीने मागासलेला आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुस्लिम समाजाची प्रगती खुंटली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय आहे,

मुस्लिम आरक्षणासाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय
गडचिरोलीत मेळावा : हाजी अनवर अली यांचे प्रतिपादन
गडचिरोली : राज्यातील मुस्लिम समाज सर्व दृष्टीने मागासलेला आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुस्लिम समाजाची प्रगती खुंटली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन हाजी अनवर अली यांनी केले.
आरमोरी मार्गावरील पटवारी भवनात बुधवारी मुस्लिम समाज मेळावा पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुश्ताक कुरेशी, महेबुब अली, अॅड. रफिक शेख, जमीर हकीम, हबीब खा पठाण, मुश्ताक हकीम आदी उपस्थित होते. मेळाव्याला मार्गदर्शन करताना अनवर अली पुढे म्हणाले, मुस्लिम आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे लावून धरण्यात आली आहे. मात्र तत्कालीन शासनाने आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. राज्यातील नवे सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यासाठी विलंब करीत आहे. सरकारकडून मुस्लिम समाजाला सहजासहजी आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे मुस्लिम समाजबांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन व संघर्ष करणे आवश्यक आहे, असे अनवर अली यावेळी म्हणाले. याप्रसंगी अॅड. रफीक शेख, महेबुब अली, मुश्ताक कुरेशी, मुश्ताक हकीम यांनी समाजाबद्दल आपले विचार मांडले. या बैठकीला जिल्ह्यातील मुस्लिम नेते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)