ऑनलाईन प्रणाली शेतकऱ्यांसाठी ठरली डाेकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:37 IST2021-01-25T04:37:15+5:302021-01-25T04:37:15+5:30
धानोरा तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत धान खरेदी केली जाते. परंतु यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या ॲप्लिकेशनवर सातबाराची नोंदणी ...

ऑनलाईन प्रणाली शेतकऱ्यांसाठी ठरली डाेकेदुखी
धानोरा तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत धान खरेदी केली जाते. परंतु यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या ॲप्लिकेशनवर सातबाराची नोंदणी झाल्याशिवाय धानाची विक्री करता येत नाही. परंतु त्या ॲप्लिकेशनवर अनेक शेतकऱ्यांच्या सातबाराची नोंदणी होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी शासनाविषयी रोष व्यक्त करीत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी धानाची मळणी करून धान घरी आणून ठेवले आहे, शासनाने धानाला चांगला भाव व बोनस जाहीर केल्याने शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीला प्राधान्य देत आहेत. परंतु केंद्र उशिरा सुरू झाल्याने अनेकांनी खाजगी व्यापाऱ्याला धान विकल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले.
धानोरा तालुक्यात धानोरा, रांगी, मुरूमगाव, मोहली, दुधमाळा, कारवाफा, सोडे, पेंढरी, गट्टा या खरेदी केंद्रावर धानाची खरेदी केली जाते. परंतु आठ दहा दिवस लोटूनही आपला नंबर का लागला नाही याविषयी संस्थेकडे विचारणा केली असता ॲप्लिकेशनमध्ये अनेकदा प्रयत्न करूनही आपल्या सातबाराची नोंदच होत नाही असे सांगण्यात येत आहे. अर्ज भरल्यानंतर सबमिट केल्यावर सर्वे नं. नाॅट सबमिट असे लिहून येते. अनेकवेळा प्रक्रिया करूनही यश येत नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.