एक हजार शेतकऱ्यांना लाभ

By Admin | Updated: September 13, 2014 23:54 IST2014-09-13T23:54:26+5:302014-09-13T23:54:26+5:30

कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १ हजार ४०८ शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यात

One thousand farmers benefit | एक हजार शेतकऱ्यांना लाभ

एक हजार शेतकऱ्यांना लाभ

गडचिरोली : कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १ हजार ४०८ शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी योजनेच्या माध्यमातून स्वत:चा फायदा करून घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २६.३२ लाखांची थकबाकी भरली. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
कृषी संजीवनी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपाच्या विद्युत बिलाची थकबाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी थकीत बिलाचा भरणा एका हफ्त्यात अथवा तीन हफ्त्यात करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तीन हफ्त्यात वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना पहिला हफ्ता म्हणून ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के रक्कम भरावयाचे होते. दुसऱ्या टप्प्यात २० सप्टेंबरपर्यंतचे २० टक्के रक्कम व तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅक्टोंबरपर्यंत १० टक्के रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक विद्युत बिलाची ५० टक्के रक्कम एकत्र भरल्यानंतर महावितरण कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांच्या उर्वरित वीज बिलावरील व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येते.
१ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ४०८ कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी २६.३२ लाख रूपये भरून कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत ज्या कृषीपंप विद्युत ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची थकबाकी नसेल, अशा स्थितीत शेतकऱ्यांना आगामी दोन त्रैमासिक बिलात ५० टक्के सूट दिल्या जात आहे. ज्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी अद्यापही कृषी संजीवनी योजनेमध्ये सहभाग घेतला नाही, अशा ग्राहकांना अपात्र ठरविण्यात येणार आहे. नियमानुसार व्याज व विलंब शुल्कासह थकीत बिल ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य कृषीपंपधारकांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी आहे. आलापल्ली उपविभागात १७५ कृषी पंपधारकांकडे ५ लाख २९ हजार ११६.३४, चामोर्शी उपविभागात ९०४ कृषी पंपधारकांकडून २१ लाख ४१ हजार १५२.५४ रूपये, एटापल्ली उपविभागात तीन कृषी पंपधारकांकडे १३००.८५, मुलचेरा उपविभागात १२१ कृषी पंपधारकांकडे २ लाख ६२ हजार ८३९.०३ रूपयांची थकबाकी आहे. तर सिरोंचा उपविभागात १५२१ कृषी पंपधारकांकडे तब्बल १ कोटी ४१ लाख ९८ हजार ९५६.०८ रूपयांची थकबाकी आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: One thousand farmers benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.