एकाच रात्री चोरट्यांनी चार घरे फोडली
By Admin | Updated: April 8, 2017 01:33 IST2017-04-08T01:33:25+5:302017-04-08T01:33:25+5:30
भयंकर उकाड्यामुळे घराला कुलूप लावून स्लॅबवर झोपलेल्या चार नागरिकांची घरे फोडून चोरट्यांनी गुरूवारच्या मध्यरात्री

एकाच रात्री चोरट्यांनी चार घरे फोडली
आष्टीतील घटना : दोन लाखांचे दागिने लंपास; रात्रीची गस्त वाढविण्याची होत आहे मागणी
आष्टी : भयंकर उकाड्यामुळे घराला कुलूप लावून स्लॅबवर झोपलेल्या चार नागरिकांची घरे फोडून चोरट्यांनी गुरूवारच्या मध्यरात्री तब्बल दोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना आष्टी येथे घडली. या घटनेमुळे गावात दहशत निर्माण झाली आहे.
आष्टी येथील सुरेश गणूजी शेडमाके हे घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबीयांसह स्लॅबवर झोपले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी कपाट तोडून त्यातील दोन लाख रुपये किमतीचे ८ तोडे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच अशोक सखाराम नेवारे व त्यांचे भाडेकरु दिवाकर विनायक भसारकर यांचेही घर चोरट्यांनी फोडले. दोघांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त केले. परंतु त्यांनी दागिने व रक्कम सुरक्षित ठेवल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. विलास कालिदास मडावी यांच्याही घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. आपल्या आईला घरात झोपवून व दरवाज्याला बाहेरुन कुलूप लावून विलास आपल्या भावासह स्लॅबवर झोपला होता. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी विजेचा दिवा सुरु करताच विलासच्या आईने "बापू पाणी पिण्यास आला काय", असा प्रश्न केला. तिने प्रश्न विचारताच चोरट्याने जोरात पळ काढला. आष्टी पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. तपासासाठी श्वान पथकही बोलविण्यात आले. उन्हाळ्यामध्ये आष्टी येथे चोरीच्या घटना वाढत असल्याचा अनुभव आहे.रात्रीच्या सुमारास गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)