एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी येथील बांडीया नदीच्या काठावर २५ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास वीज पडल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. आठ शेळ्याही मृत्युमुखी पडल्या आहेत. ललित मडावी (२२) रा. जारावंडी असे मृतकाचे नाव आहे. तर मनाबाई दलसू कोवाची (३५), मुकूंदा देवाजी सोनुले (३२), रूपेश विश्वनाथ सोनुले (२८), अजय श्रावण कामडे (२०) व एक आठ वर्षाचा मुलगा हे पाचजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हे सर्वजण बांडीया नदीच्या काठावर शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. याचदरम्यान वीज कोसळल्याने ही घटना घडली. जखमींना सर्वप्रथम जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र याठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने सर्व जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मृतकाच्या नातेवाईकांना व जखमींना मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे जारावंडी गावावर दु:खाचे सावट पसरले आहे. पोळा सणाच्या आनंदावरही विरजन पडले.
वीज पडून एक ठार; पाच जण जखमी
By admin | Updated: August 26, 2014 00:00 IST