पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:44+5:30

आरमोरी ते देसाईगंज जवळील कुरूडपर्यंतच्या जवळपास १० किलोमीटरच्या जंगलात गेल्या दिड महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी तर एकाला गंभीर जखमी व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी याच भागात वाघाने दोन जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तर काहींना जखमी केले होते. याशिवाय अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर वाघिणीला पकडण्यात आले, पण तिचे तीन बछडे याच जंगलात होते.

Once again the spark of human-wildlife conflict | पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी

पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी

Next
ठळक मुद्देदीड महिन्यात तिघांचा बळी; वाघांचे अस्तित्व ठरत आहे मनुष्यासाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचा ७६ टक्के भूभाग असला तरी हिंस्त्र वन्यप्राण्यांचे प्रमाण मोजक्याच भागात आहे. त्यात प्रामुख्याने आरमोरी ते देसाईगंज हा भागातील जंगल वाघांसाठी अधिक पोषक ठरक आहे. पण वाघांचा हा वावर स्थानिक नागरिकांसाठी मात्र जीवघेणा ठरत असल्याने वाघ महत्वाचा की मनुष्य, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
आरमोरी ते देसाईगंज जवळील कुरूडपर्यंतच्या जवळपास १० किलोमीटरच्या जंगलात गेल्या दिड महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी तर एकाला गंभीर जखमी व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी याच भागात वाघाने दोन जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तर काहींना जखमी केले होते. याशिवाय अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर वाघिणीला पकडण्यात आले, पण तिचे तीन बछडे याच जंगलात होते.
वास्तविक गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला विभागणाऱ्या वैनगंगा नदीच्या पलिकडे ब्रह्मपुरी तालुक्याच्या हद्दीत मोठ्या संख्येने वाघ आहेत. उन्हाळ्यात नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर तिकडील वाघ गडचिरोली जिल्ह्यात येतात. पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर त्यांना पुन्हा तिकडे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे देसाईगंज-आरमोरीच्या पट्ट्यात नेमके किती वाघ अस्तित्वात आहेत याचा नेमका आकडा वनविभागालाही सांगणे कठीण झाले आहे.
दुचाकीने प्रवास करणाऱ्यांसह शेतकरी, शेतमजुर, वनोपजासाठी जंगलात जाणाºयांचा जीव आज धोक्यात आला आहे. वनविभागाने त्यांच्या संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. परंतु सध्या तरी वन विभाग याबाबतीत पूर्णपणे हतबल असल्याचे दिसून येते.

किती दिवस असे दहशतीत जगायचे?
आरमोरी-देसाईगंज परिसरातील मानव-वन्यजीव संघर्षावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व गडचिरोली जिल्ह्याच्या संस्कृतीचे अभ्यासक अरविंद पोरेड्डीवार यांनी चिंता व्यक्त करत किती दिवस असे दहशतीत जगायचे? असा सवाल उपस्थित केला आहे. एकीकडे कोरोनाची तर दुसरीकडे वाघांची दहशत असताना नागरिकांची रोजीरोटीच बंद होण्याची शक्यता आहे. वाघांच्या अस्तित्वासाठी मानवाचा बळी जाऊ देणे योग्य नाही. यावर तोडगा काढण्यासाठी ही बाब यापूर्वीही सरकारच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

जंगल शाप की वरदान?
राज्यात सर्वाधिक जंगल असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. या जंगलात कोट्यवधी रुपयांची वनसंपत्ती आणि हजारो लोकांच्या उपजीविकेचे साधन असलेले वनोपज आहे. परंतु वाघ, बिबट्या किंवा रानडुकरांच्या हल्ल्यात नागरिकांचे बळी जातात किंवा कायमचे अपंगत्व येते, त्यावेळी जिल्ह्यातील हे जंगल लोकांसाठी शाप आहे की वरदान, असा प्रश्न निर्माण होतो.

Web Title: Once again the spark of human-wildlife conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.