दुर्गम भागातील बसफेऱ्या बंद

By Admin | Updated: September 1, 2014 23:35 IST2014-09-01T23:35:12+5:302014-09-01T23:35:12+5:30

काही मार्गावर उत्पन्न मिळत नाही त्याचबरोबर दुर्गम भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. हे कारण पुढे करीत गडचिरोली आगार प्रशासनाने अनेक बसफेऱ्या बंद केल्या आहेत.

Offshore bus stand closed | दुर्गम भागातील बसफेऱ्या बंद

दुर्गम भागातील बसफेऱ्या बंद

गडचिरोली : काही मार्गावर उत्पन्न मिळत नाही त्याचबरोबर दुर्गम भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. हे कारण पुढे करीत गडचिरोली आगार प्रशासनाने अनेक बसफेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळ प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर बसफेऱ्या सुरू करण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
नफा- तोट्याचा विचार न करता शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाची सुविधा एसटीच्या मार्फतीने दिली जाते. दरदिवशी राज्यातील लाखो प्रवाशी एसटीने प्रवास करतात. त्यामुळेच एसटीला राज्याची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाते. गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येचे प्रमाण विरळ आहे. त्यामुळे खासगी वाहनांंची संख्या मर्यादित आहे. परिणामी प्रवाशांच्या वाहतुकीचा भार एसटीलाच उचलावा लागतो. नागरिकही सर्वप्रथम एसटीलाच प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
गडचिरोली आगाराने दुर्गम भागातही बसफेऱ्या सुरू केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला होता. मात्र मागील काही दिवसांपासून एसटी प्रशासनाने व्यवहारीकता दाखवत ज्या मार्गावरून उत्पन्न मिळत नाही. अशा मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे. गडचिरोली- देसाईगंज-कोटरा- कोटगुल ही बसफेरी अत्यंत महत्वाची होती. ही बस जवळपास अर्धा जिल्ह्याचा प्रवास करीत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिक याच बसने जिल्हा मुख्यालयी येत होते. ही बस दुपारी २ वाजता गडचिरोली येथे पोहोचत होती. तर दुसरी स्वतंत्र बस कोटगुलसाठी गडचिरोली येथून १.१० वाजता रवाना होत होती. यासाठी स्वतंत्र दोन बसेस ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या बसफेरीमधून पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याचे कारण पुढे करीत एसटी विभागाने सदर बसफेरी बंद केली आहे. त्याचबरोबर गडचिरोली-धानोरा- सावरगाव- ग्यारापत्ती- कोटगूल- कोरची ही बसफेरीसुध्दा मागील १ वर्षापासून बंद केली आहे. सदर बसफेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी अनेकवेळा पोलीस विभागाने एसटी प्रशासनाकडे करूनही उत्पन्न मिळत नसल्याने सदर बसफेरीसुध्दा बंद केली आहे.
गडचिरोली-चंद्रपूर मार्गाची सकाळी १०.४५ व १.४५ ची बसफेरी सुध्दा बंद करण्यात आली आहे. आरमोरी- देऊळगाव- भाकरोंडी ही बस सध्या कोरेगावपर्यंतच सोडण्यात येत आहे. विद्युत तारा लोंबकळत असल्याने सदर बसफेरी बंद करण्यात आली आहे.
एसटी सुरू राहिल्यास खासगी वाहनधारकांवर वचक राहते. त्यामुळे ते जास्त तिकीट दर आकारू शकत नाही. महत्वाचे म्हणजे याच मार्गावरून खासगी वाहने आपला खर्च काढू शकतात. तर एसटीला ते का जमत नाही असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. महत्त्वाचे म्हणजे दुर्गम भागातील प्रवाशांना तिकीट न देताच प्रवासाची रक्कम वसूल केली जाते. सदर रक्कम एसटीच्या उत्पन्नात न जाता चालक व वाहकाच्या घश्यात जाते. याचा फटका मात्र बसफेरी बंद झाल्यावर दुर्गम भागातील प्रवाशांना सहन करावा लागतो. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Offshore bus stand closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.