वनमजुरांकडून रोपवाटिकेची कामे
By Admin | Updated: June 26, 2014 23:12 IST2014-06-26T23:12:23+5:302014-06-26T23:12:23+5:30
शासनाच्या निर्देशानुसार बहुतांश विभागाकडून सध्या वृक्षारोपण व रोपवाटीकेची काम सुरू आहे. आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे रोपवाटीकेची कामे वनमजुराकडून सुरू आहे.

वनमजुरांकडून रोपवाटिकेची कामे
जोगीसाखरा : शासनाच्या निर्देशानुसार बहुतांश विभागाकडून सध्या वृक्षारोपण व रोपवाटीकेची काम सुरू आहे. आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे रोपवाटीकेची कामे वनमजुराकडून सुरू आहे. त्यामुळे जंगल वाऱ्यावर असल्याने अवैध वृक्षतोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत अवैध वृक्षतोडीस जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जोगीसाखरा येथील रोपवाटीकेमध्ये सागवानचे रोपे तयार करण्यासाठी जानेवारी महिन्यात बेड तयार करण्यात आले. वडसा वनविभागाच्या निर्देशानुसार एप्रिल महिन्यात बीज लागवड करून रोपे तयार करण्यासाठी आरमोरीच्या संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या खात्यात १ लाख २५ हजार रूपये जमा केले असल्याचे समजते. दरम्यान वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी या निधीची वाच्यता कुठेही केली नाही. तसेच या निधीतून कामही केले नाही. १९ जून रोजी वडसाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी जोगीसाखराच्या रोपवाटीकेला भेट दिली असता, सदर प्रकार उघडकीस आला. सागवान रोपे एप्रिल ते महिन्याच्या अति उष्ण वातावरणात लागवड केले असते तर आज रोपटे उगविले असते आणि यंदा रोपवन तयार करण्याच्या कामी आले असते. मात्र वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी रोपे तयार करण्याची चुकीची वेळ निवडली असून रोपे लागवडीवरील खर्च व्यर्थ जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. आरमोरी वनपरिक्षेत्रात सध्या अवैध वृक्षतोड वाढली असून जंगलाच्या संरक्षणासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यातल्यात्यात वनमजुरांची संख्या फारच कमी आहे. यामुळे कार्यरत वनरक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. सध्या या वनपरिक्षेत्रातील पाच वनरक्षक प्रशिक्षणासाठी बाहेर गेले आहे. एका वनरक्षकाकडे दोन ते तीन बिटाचा कारभार त्यामुळे सध्या स्थितीत खऱ्या अर्थाने रोजंदारी वनमजुरच तुटपुंज्या वेतनावर वनाचे संरक्षण करीत आहे.
वनविभागाच्यावतीने वनरक्षकाच्या सोबतीला वनांचे रक्षण करण्यासाठी रोजंदारी वनमजुर वर्षभरासाठ लावले जाते. यांचेकडून वनांचे रक्षण करण्याची जबाबदारी वनविभागावर सोपविण्यात आली आहे. असे असताना सुध्दा आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी रोहायोंतर्गत सुरू असलेली रोपवाटीकेची कामे २५ ते ३० वनमजुरांकडून करून घेत आहेत. त्यामुळे गावातील इतर बेरोजगार मजुरांचा रोजगारही हिरावल्या गेला आहे. साग रोपे तयार करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असतानाही गावातील नागरिकांना डावलून वनमजुरांकडून काम करून घेतल्या जात आहे. गावातील नागरिकांना वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी कामावर न घेता संरक्षणासाठी असलेल्या वनमजुरांना रोपवाटीकेच्या कामात जुंपले आहे. (वार्ताहर)