अहेरीच्या विद्याभारतीत विद्यार्थ्यांच्या संख्येत गोंधळच
By Admin | Updated: April 9, 2015 01:31 IST2015-04-09T01:31:42+5:302015-04-09T01:31:42+5:30
अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात गुरूकूल बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने वर्धा जिल्ह्यातून येऊन येथे विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज सुरू केले आहे.

अहेरीच्या विद्याभारतीत विद्यार्थ्यांच्या संख्येत गोंधळच
अहेरी : अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात गुरूकूल बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने वर्धा जिल्ह्यातून येऊन येथे विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज सुरू केले आहे. या महाविद्यालयाच्या पटसंख्येवर दाखविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी कित्येकांनी परीक्षेसाठी अर्जच भरलेले नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मात्र या महाविद्यालयाने सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी तब्बल ९१ विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महाविद्यालयाविषयीही शंकेची पाल चुकचुकली आहे.
अहेरी हा गडचिरोली जिल्ह्याचा दुर्गम तालुका आहे. या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज, अहेरी महाविद्यालय एका लहानशा जागेत चालविले जात आहे. येथे १९२ विद्यार्थी संख्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात १५ ते २० विद्यार्थी महाविद्यालयात नियमितपणे येतात, असे दिसून येते. कला शाखेच्या प्रथम वर्षाला ११ विद्यार्थी, द्वितीय वर्षाला ३७ विद्यार्थी तर तृतीय वर्षाला तीन विद्यार्थी असल्याची माहिती देण्यात आली. तर वाणिज्य शाखेमध्ये फक्त प्रथम वर्षच असून येथे ४० विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ही संख्या पाहू जाता कागदोपत्री बराच अभ्यासक्रम येथे पार पाडला जात असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
ग्रंथपाल (बि.लिब) अभ्यासक्रमाला १३ विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखविण्यात आला आहे. मात्र परीक्षेचा अर्ज नऊ विद्यार्थ्यांनी भरला व आठ विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेला उपस्थिती लावली, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. १९२ विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या या महाविद्यालयात नऊ शिक्षक आहेत. त्यापैकी दोघांनी नुकतेच महाविद्यालय सोडले. आता सातच शिक्षक उरलेले आहे. या महाविद्यालयात एक शिक्षकेत्तर कर्मचारी असून स्वच्छतेच्या कामासाठी रोजंदारीवर एक महिला काम करते. प्रत्येक शिक्षकाला पाच हजार रूपये पगारावर ठरविण्यात आले आहे. मात्र मागील पाच महिन्यांपासून पगार मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. कुठल्याही सुविधा नसलेल्या या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश कोणत्या उद्देशाने घेतले, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. या महाविद्यालयात अनुसूचित जातीचे ९७, अनुसूचित जमातीचे ५२, एनटी प्रवर्गाचे १४, एसबीसी १, ओबीसी १८, ओपन १० प्रवर्गाचे विद्यार्थी असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. एकूणच दुर्गम भागात असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येविषयी सध्यातरी गोंधळाची परिस्थिती कायम आहे.