२४२ ग्रामपंचायतीत टॉवरची संख्या वाढणार

By Admin | Updated: October 27, 2016 01:40 IST2016-10-27T01:40:55+5:302016-10-27T01:40:55+5:30

गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या वतीने ग्रामपंचायतीत ब्राँडबँड सेवा जोडणीचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे.

The number of 242 gram panchayat towers will increase | २४२ ग्रामपंचायतीत टॉवरची संख्या वाढणार

२४२ ग्रामपंचायतीत टॉवरची संख्या वाढणार

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : २३ टॉवर उभारणीस जागा उपलब्ध; ब्राँडबँडचे जाळे पसरणार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलच्या वतीने ग्रामपंचायतीत ब्राँडबँड सेवा जोडणीचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे. डिसेंबर २०१६ अखेर जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायती ब्राँडबँड सेवेने जोडल्या जातील. जिल्हा प्रशासनाने चांगल्या नेटवर्कसाठी २३ टॉवर उभारणीस जागा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाधिकारी एस. आर. नायक यांनी दिली आहे.
जिल्हा समन्वय समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोेनवने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जवळेकर, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क बीएसएनएलचे आहे. काही कंपन्यांचे फोर-जी नेटवर्क उपलब्ध असताना बीएसएनएलचे कव्हरेज कमी आहे, अशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्याकडे लक्ष देण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात १० मोबाईल टॉवरची सेवा सुरू झाली आहे. याशिवाय ४० नव्या टॉवरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यातील २३ टॉवर उभारणीस जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित ठिकाणी येत्या आठ दिवसांत जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. केंद्र सरकारच्या नक्षलग्रस्त भागातील जिल्हे बळकट व सुरक्षित करण्याच्या योजनेत देखील मोबाईल नेटवर्क विस्ताराचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्या टप्प्यात हे प्रस्तावित ४० टॉवर असून याअंतर्गत एकूण १०० टॉवरचे काम होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

एटीएमची केंद्रांची संख्या वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना सोय व्हावी व त्यांचा वेळ आणि त्रास कमी व्हावा, याकरिता एटीएम केंद्रांची संख्या वाढविण्यास बँकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिल्या. कुरखेडाच्या पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरावरील बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेचे बाबरे, तहसीलदार अजय चरडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये केवळ ६० एटीएम केंद्र आहेत. यातील बहुतेक केंद्र हे शहरी भागात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वारंवार शहरी भागात यावे लागते, यात वेळ व पैसा खर्च होतो. याची जाणीव बँकांनी ठेवण्याची गरज आहे. जिल्ह्यात किसान क्रेडीड कार्डधारक शेतकऱ्यांची संख्या दीड लाखांहून अधिक आहे. या सर्वांना ५० हजारांपर्यंत पतमर्यादा उपलब्ध आहे. मात्र एटीएम केंद्राअभावी त्यांना सवलत देणे अवघड झाले आहे. अगदी साध्या व्यवहारांसाठी शेतकऱ्यांना शहरी भागात तालुक्याच्या ठिकाणी येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Web Title: The number of 242 gram panchayat towers will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.