आता दारूअड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी वनविभाग घेणार पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST2021-03-18T04:37:07+5:302021-03-18T04:37:07+5:30
आरमाेरी : आरमाेरी वनपरिक्षेत्रातील काही जंगल परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे गाव संघटन दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करू शकत नाही. ...

आता दारूअड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी वनविभाग घेणार पुढाकार
आरमाेरी : आरमाेरी वनपरिक्षेत्रातील काही जंगल परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे गाव संघटन दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करू शकत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आरएफओ सचिन डोंगरवार व मुक्तिपथ तालुका चमूची बैठक पार पडली. या वेळी जंगल परिसरातील दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी वनविभाग पुढाकार घेणार असल्याची माहिती डोंगरवार यांनी दिली. यामुळे निश्चितच जंगल परिसरातील दारू अड्डे उद्ध्वस्त होऊन अवैध दारूविक्रीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत पेटतुकूम, मोहटोला, अरसोडा या जंगल परिसरात दारू विक्रेत्यांनी दारू गाळण्याचे अड्डे निर्माण केले आहेत. मात्र जंगल परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे गाव संघटनाच्या माध्यमातून अहिंसक कृती करण्यास अडचण निर्माण होत आहे. ही संधी साधत अवैध दारू विक्रेत्यांनी आपला व्यवसाय जोमात सुरू केला आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आरमोरीचे आरएफओ डोंगरवार व मुक्तिपथची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जंगल परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. ज्या भागात वाघाची दहशत आहे, त्या परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे नियोजन करून वनविभागाचे विशेष पथक व मुक्तिपथ तालुका चमू संयुक्तरीत्या कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून वन परिक्षेत्रातील अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आश्वासन आरएफओ डोंगरवार यांनी दिले आहे. यामुळे निश्चितच जंगल परिसरात असलेल्या दारू भट्ट्या उद्ध्वस्त होऊन अवैध दारू विक्रीचे प्रमाण कमी होणार आहे. या वेळी मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिनखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर उपस्थित होते.