तापमान नोंदीची सुविधाच नाही
By Admin | Updated: December 22, 2014 22:47 IST2014-12-22T22:47:32+5:302014-12-22T22:47:32+5:30
२१ व्या शतकात संगणक क्रांतीमुळे सर्वत्र माहिती क्षणात उपलब्ध असतांना जिल्ह्यात मात्र तापमान नोंदीची कोणतीच अधिकृत सुविधाच उपलब्ध नसल्याने दैनंदिन तापमान नेमके किती आहे.

तापमान नोंदीची सुविधाच नाही
गडचिरोली : २१ व्या शतकात संगणक क्रांतीमुळे सर्वत्र माहिती क्षणात उपलब्ध असतांना जिल्ह्यात मात्र तापमान नोंदीची कोणतीच अधिकृत सुविधाच उपलब्ध नसल्याने दैनंदिन तापमान नेमके किती आहे. याबाबत अधिकृत माहिती प्राप्त होत नाही. त्यामुळै नागरिक व विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान शास्त्र पुणेच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयातील दैनंदिन तापमानाची नोंद घेतली जाते. तशी माहिती संकेतस्थळाववर दिली जात असते. यामुळे संकेतस्थळावरून दैनंदिन तापमानाची माहिती मिळण्याबरोबरच अन्य बाबीचीही माहिती मिळत असल्याने त्यादृष्टीने कामकाजाचे नियोजन शक्य होत असते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अशाप्रकारची सुविधाच उपलब्ध नाही. काही वर्षापूर्वी कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात दैनंदिन तापमानाची नोंद घेण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे ठरविण्यात आले. या यंत्रणेमार्फत दैनंदिन तापमानाची नोंद मिळण्याबरोरच अन्य माहितीही मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले होते. चंद्रपूर मार्गावर तापमान दर्शविणारे डिजीटल फलक लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र यापैकी कोणतीच बात साध्य झाली नाही. यामुळे जिल्ह्याचे अधिकृत तापमान नेमके किती याचा उलगडा होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्याचा पारा अनेकदा ४३ सेल्सिअस अंशाच्या पलिकडे जातो. या संदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वर्तमान पत्रांनाच विचारणा होत असते. सध्य:स्थितीत जिल्ह्यात हुडहुडी निर्माण झाली आहे. दिवसभर वातावरण आभ्राच्छादीत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे तापमान ८ ते १० सेल्सिअस अंशाच्या दरम्यान आहे. पावसाळ्यात पर्जन्यमान तसेच हिवाळ्यात पारा मोजमाप करण्यासाठी सोय उपलब्ध नसल्याने तापमान नोंदीची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)