ना बँडबाजा, ना शाही थाट फक्त ३५० रुपयांत बांधली जाते रेशीमगाठ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:47 IST2025-01-08T14:46:12+5:302025-01-08T14:47:23+5:30
लाखो रुपयांची बचत : शेकडो युवक-युवतींचा नोंदणी विवाह

No band play, no royal pomp, a marriage if performed for just Rs. 350!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लग्न सोहळा म्हटला की, लाखोंचा खर्च येतो. मात्र, काही कुटुंबे याला फाटा देत नोंदणी पद्धतीने विवाह सोहळा करण्याला प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अवघ्या ३५० रुपयांत गेल्या दोन वर्षात शेकडो युवक-युवतींनी नोंदणी पद्धतीने विवाह उरकला आहे.
कोरोना काळात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पडले. हा फंडा आता कोरोनानंतरच्या काळात डेस्टीनेशन वेडिंगसाठी वापरला जात आहे. नवरा-नवरीची हौस अन् पैशांची बचत करणारी ही लग्नपद्धत आता लोकप्रिय होत आहे. नोंदणी विवाहाद्वारे लग्नावर शिक्कामोर्तबही केले जाते. लग्न सोहळ्याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. काहींना साध्या पद्धतीने लग्न करायचे असते, तर काहींना धूमधडाक्याने लग्न करावेसे वाटते. त्यामुळे डेस्टीनेशन वेडिंगची क्रेझ वाढत आहे.
काय कागदपत्रे ?
वधू आणि वराचा वयाचा दाखला, आधारकार्ड, टीसी किवा सनद, दोघांपैकी एक जण स्थानिक जिल्ह्यातील रहिवासी आवश्यक, मुलीचे वय १८, तर मुलाचे वय २१ पूर्ण असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन करू शकता अर्ज
दुय्यम उपनिबंधक कार्यालयात ऑफलाइन व या विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येत असल्याची माहिती मिळाली आहे. ऑनलाइन अर्ज करा अन् झटपट लग्न उरकवा, अशी जनजागृती प्रशासनाच्या वतीने होत आहे
कोरोना काळात लग्नात ५० वऱ्हाडी
कोरोना कालावधीत नोंदणी पद्धतीने लग्न करणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. यामध्ये ब्राम्हण, जेवण वाढणारे यासहित ५० पेक्षा कमी लोकांना सहभागी राहण्याची अनुमती होती.
नोंदणी विवाहाला किती खर्च येतो?
नोंदणी विवाह करण्यासाठी १५० रुपयांचे चालान व नोटीससाठी ५० ते १०० रुपये व वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी, असा एकूण ३५० रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे दिसून येते.
दमछाक नकोय, नोंदणी विवाहाला पसंती
लग्न समारंभ म्हटले की, घरच्या व्यक्तींची चांगलीच दमछाक होते. खर्चदेखील मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नोंदणी विवाहाकडे कल वाढला आहे. त्यामुळे या दशकात अनेकजण नोंदणी विवाहाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक जोडपी विवाह उरकल्यानंतर नोंदणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
वेडिंग डेस्टीनेशनचे बजेट ५० लाखांपर्यंत
काहीजण वेडिंग डेस्टीनेशनमध्ये मोजक्याच पाहुण्यांत लग्नापेक्षा अधिक खर्च करतात, तर काहीजण अधिक खर्च करतात. • लग्नाचे पाहुणे, मित्रमंडळी, परिचित यांच्याऐवजी जवळच्याच नातेवाइकांना बोलावून हॉटेलमध्ये बुकिंग केले जाते. • सध्या राज्यात होत असलेल्या डेस्टीनेशन वेडिंगचे बजेट ५० लाखांपर्यंत असते, काहींचे तर यापेक्षा जास्त असते.