-तर पुढील वर्षी वाढणार ४५०० हेक्टर सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:28 IST2017-12-03T22:28:14+5:302017-12-03T22:28:42+5:30
राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५०० सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी १८५२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित २६४८ विहिरींचे काम या महिन्यात सुरू होणार आहे.

-तर पुढील वर्षी वाढणार ४५०० हेक्टर सिंचन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५०० सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी १८५२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित २६४८ विहिरींचे काम या महिन्यात सुरू होणार आहे. येत्या उन्हाळ्यापर्यंत या विहिरी बांधून पूर्ण झाल्यास जिल्ह्यात पुढील वर्षी ४५०० हेक्टर अतिरिक्त सिंचनाची सोय होणार आहे.
पूर्व विदर्भात सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने ११ हजार ६१४ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ४५०० विहिरी गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर झाल्या आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत १८१५ विहिरी बांधून झाल्या आहेत. प्रतिविहीर १ हेक्टर याप्रमाणे सिंचन सुविधा निर्माण होते. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी मंजूर ४५०० विहिरी पूर्ण झाल्यानंतर तेवढे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
जिल्ह्यात बहुतांश भूभागावर जंगल असल्याने केवळ दिना प्रकल्प वगळता कोणताही मोठा सिंचन प्रकल्प नाही. परिणामी सिंचनासाठी शेतात विहिरी किंवा बोअरवेल खोदणे हाच पर्याय आहे. त्यामुळेच पूर्व विदर्भात सर्वाधिक सिंचन विहिरी गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत.
एका विहिरीसाठी शासनाकडून २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. परंतू विहिरींचे बांधकाम स्वत: शेतकºयांनाच करायचे आहे. जसजसे बांधकाम होईल तसतसे त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदानाची रक्कम दिली जाते. मात्र जिल्ह्यात विहिरींचे खोदकाम तातडीने करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. मशिनरीसुद्धा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे विहिरींच्या कामास थोडा विलंब होत असला तरी हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून सुरू आहे. सिंचन विहिरींची मागणी जिल्ह्यात वाढली आहे.
आणखी ३५०० विहिरींचा प्रस्ताव
‘मागेल त्याला विहीर’ अशी घोषणा करीत हा सिंचन विहिरींचा कार्यक्रम जाहीर केल्याने जिल्हाभरातून ८२३२ अर्ज आले होते. त्यातून ६९४८ जण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४२०२ शेतकºयांच्या अर्जांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विहिरी खोदण्यासाठी इच्छुकांची संख्या बघता जिल्ह्यासाठी आणखी ३५०० विहिरी मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असल्याची माहिती लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.जी.रामटेके यांनी दिली.