गडचिरोली ठाण्यात २५ पोलिसांची नवीन टीम
By Admin | Updated: January 27, 2015 23:33 IST2015-01-27T23:33:16+5:302015-01-27T23:33:16+5:30
स्थानिक पोलीस स्टेशनला २५ पोलिसांची नवीन टीम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यामार्फतीने दिली जाणार असून यातील एक पीएसआयसह सात पोलीस ठाण्यात रूजूसुद्धा झाले आहेत.

गडचिरोली ठाण्यात २५ पोलिसांची नवीन टीम
गडचिरोली : स्थानिक पोलीस स्टेशनला २५ पोलिसांची नवीन टीम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यामार्फतीने दिली जाणार असून यातील एक पीएसआयसह सात पोलीस ठाण्यात रूजूसुद्धा झाले आहेत.
गडचिरोली पोलीस ठाण्यात एकूण ८६ पोलिसांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे ३९ पदे रिक्त होती. गडचिरोली शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहरात नेहमीच लहान-मोठे गुन्हे घडतात. शहरासह ग्रामीण भागातही अवैध दारूसह इतरही अपराध घडतात. गडचिरोली जिल्ह्याच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच विकास कामांचा आढावा घेण्यासाठी नेहमीच वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांचे दौरे राहतात. त्यांच्या दौऱ्यादरम्यान बंदोबस्तासाठी पोलिसांना रात्रंदिवस तैनात राहावे लागते. सण, उत्सवाच्यावेळीही शहरात पोलिसांचा चोख बंदोबंस्त ठेवावा लागतो. ही सर्व कामे अपुऱ्या कर्मचाऱ्यांना सांभाळताना तारेवरची कसरत होत होती. गुन्ह्यांचा तपास करताना अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत होता. या सर्व समस्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी गडचिरोली पोलीस ठाण्यातील रिक्त पदे भरण्यास प्रथम प्राधान्य दिले.
नक्षलविरोधी अभियानाची टीम सक्षम व सशक्त करण्याबरोबरच वयस्क पोलिसांच्या अनुभवाचा फायदा गुन्ह्यांच्या तपासासाठी व्हावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मागील आठ दिवसांपासून समायोजनाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेंतर्गत गडचिरोली ठाण्याला झुकते माप देत एक पोलीस उपनिरीक्षकासह २५ पोलीस देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सात पोलीस कर्मचारी एक पोलीस उपनिरीक्षक रूजू झाले आहेत. उर्वरित कर्मचारी ८ ते १५ दिवसांमध्ये गडचिरोली ठाण्यात रूजू होणार आहेत.
गडचिरोली पोलीस ठाण्यात इतर ठाण्यांच्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तिने तक्रार केल्यानंतर त्याचा तपास करावा लागतो. दैनंदिन बंदोबस्त व त्यातच गुन्ह्याचा तपास यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी वैतागून गेले होते. तपासाला व चौकशीला विलंब होत असल्याने नागरिकांना वेळीच न्याय मिळत नसल्याची ओरड सुरू झाली होती. ठाण्यात नवीन पोलीस कर्मचारी रूजू होण्यामुळे कामाचा ताण कमी होऊन गुन्ह्यांचा तपास तत्काळ होण्यास मदत होणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाने पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले आहे. (नगर प्रतिनिधी)