जुन्या रस्त्यावर मुरूम टाकून दाखविला नवीन रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:42 IST2018-04-18T00:42:00+5:302018-04-18T00:42:00+5:30
सन २०१५-१६ मध्ये ज्या पांदन रस्त्याचे खडीकरण झाले होते, तोच २०० मीटर रस्ता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरून त्यावर मुरूम पसरवून नवीन रस्ता दाखविला व कंत्राटदाराने पैशाची उचल सुद्धा केली असल्याचा आरोप देलनवाडी येथील नागरिकांनी केला आहे.

जुन्या रस्त्यावर मुरूम टाकून दाखविला नवीन रस्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : सन २०१५-१६ मध्ये ज्या पांदन रस्त्याचे खडीकरण झाले होते, तोच २०० मीटर रस्ता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरून त्यावर मुरूम पसरवून नवीन रस्ता दाखविला व कंत्राटदाराने पैशाची उचल सुद्धा केली असल्याचा आरोप देलनवाडी येथील नागरिकांनी केला आहे.
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील नळ योजनेच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २०१८ मध्ये रस्ता मंजूर करण्यात आला होता. जे काम मंजूर झाले, त्यातील पाण्याची टाकी ते विठ्ठल ढोक यांच्या शेतापर्यंतच्या रस्त्यावर गिट्टी, मुरूम टाकून नवीन रस्ता तयार करण्यात आला. मात्र जीवन दडमल ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्याचे काम २०१६-१७ मध्येच पूर्ण झाले. त्याचवेळी या रस्त्याचे खडीकरण झाले होते. जुन्या रस्त्यालाच व्यवस्थित ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरून त्याला नवीन रस्ता दाखविला. रस्त्याच्या कडा बुजविण्यासाठी त्याच ठिकाणची नदी किनाऱ्याची माती खोदल्याने नदी किनाऱ्यांची फार मोठी हानी झाली आहे. या पांदन रस्त्यासाठी व छोट्या पुलाच्या बांधकामासाठी रेती व गिट्टी अवैध खनन करून वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर पूल व रस्त्याचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करावी, अशी मागणी देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम, सेवा सहकारी संस्थेचे उपसभापती रत्नाकर धाईत, माजी सरपंच आबाजी कन्नाके, राहुल धाईत, ईश्वर खांडेकर, भाऊराव घोडमारे, युवराज गेडाम, प्रशांत ढोक, श्यामराव घोडमारे यांनी केली आहे.
बांधकाम सुरू असताना बांधकामाची पाहणी करून बिल काढणे ही अभियंत्यांची जबाबदारी आहे. काम झाले नसतानाही बिल निघाले आहे, याचा अर्थ यात अभियंत्यांचा सुद्धा हात असल्याचा आरोप देलनवाडी येथील नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.