सामाजिक भवन मार्गावर नवीन अतिक्रमण

By Admin | Updated: June 25, 2016 01:22 IST2016-06-25T01:20:48+5:302016-06-25T01:22:11+5:30

शहरातील प्रत्येक मार्गाच्या बाजूला अतिक्रमित दुकाने थाटण्यात आली आहेत. वाढत्या शहराबरोबरच अतिक्रमित दुकानांचीही संख्या वाढत चालली आहे.

New encroachment on the social building route | सामाजिक भवन मार्गावर नवीन अतिक्रमण

सामाजिक भवन मार्गावर नवीन अतिक्रमण

वाहतुकीची समस्या गंभीर : नगर परिषद व संबंधित विभागांचे दुर्लक्ष
गडचिरोली : शहरातील प्रत्येक मार्गाच्या बाजूला अतिक्रमित दुकाने थाटण्यात आली आहेत. वाढत्या शहराबरोबरच अतिक्रमित दुकानांचीही संख्या वाढत चालली आहे. सामाजिक न्याय भवन परिसरातील नागरिकांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन या परिसरातसुद्धा दुकाने थाटण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी लाकडी खांब गाडून जागा ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे.

आयटीआयकडून एलआयसी आॅफिसकडे जाताना सामाजिक न्याय भवनातील कार्यालय, वन विभागाचे कार्यालय, महाराष्ट्र जीनव प्राधिकरणचे कार्यालय, जिल्हा ग्रंथालय आदी कार्यालये सुरू झाले आहेत. या कार्यालयांमध्ये शेकडो कर्मचारी काम करतात. त्याचबरोबर आयटीआयमध्ये शिक्षणासाठी व जिल्हा ग्रंथालयात वाचन करण्यासाठी शेकडो विद्यार्थी दरदिवशी येतात. यांच्या माध्यमातून विक्री वाढीस लागते. दुकान थाटण्यासाठी लाखो रूपये खर्चुन जागा खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटून चहा व खर्राची विक्री केली जाते.
दुकानदारांनी मुख्य मार्गावर आयटीआयसमोरची पूर्ण जागा हडप केली आहे. या जागेवर दुकाने थाटली आहेत. येथील जागा शिल्लक न राहिल्याने आता दुकानदारांनी आपला मोर्चा सामाजिक न्याय भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर वळविला आहे. १५ दिवसांपूर्वी या मार्गावरची जागा साफ करून लाकडी खांब गाडून ठेवले आहेत. पुढील आठ दिवसांत या ठिकाणी दुकान थाटले जाणार आहे. आजपर्यंत या मार्गावर एकही दुकान नव्हता. त्यामुळे हा मार्ग प्रशस्त दिसत होता. मात्र अतिक्रमणाची कीड याही मार्गाला लागली आहे. येत्या काही दिवसात या मार्गावरील संपूर्ण जागा ताब्यात घेतली जाणार आहे.
सदर अतिक्रमण प्रशासकीय कार्यालयांच्या बाजुला झाले आहे. त्यामुळे ते अतिक्रमण हटविणे ही आपली जबाबदारी नाही, असे सांगत नगर परिषद हात झटकते. तर आपल्या संरक्षण भिंतीच्या पलिकडे अतिक्रमण असल्याने आपण काहीच करू शकत नाही, अशी भूमिका संबंधित शासकीय कार्यालय घेते. त्यामुळे अतिक्रमणधारकांना धाक दाखविणारा कुणीच राहिला नाही. परिणामी गडचिरोली शहरात अतिक्रमणाची समस्या वाढत चालली आहे. (नगर प्रतिनिधी)

जिल्हाधिकारी कार्यालयालाही अतिक्रमणाचा विळखा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला आता अनेक प्रशासकीय इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरातही नागरिकांची गर्दी वाढणार आहे. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या बाजुसही झोपड्या उभारून अतिक्रमण केले जात आहे. या झोपड्यांचा विस्तार हळूहळू जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे. सद्यस्थितीत जरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी समोर अतिक्रमण नसले तरी जिल्हा परिषदेप्रमाणेच या कार्यालयासमोरसुद्धा अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: New encroachment on the social building route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.