Neglected mud sludge for four years | चार वर्षांपासून गाळ उपशाकडे दुर्लक्ष

चार वर्षांपासून गाळ उपशाकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देग्राम पंचायत उदासीन : घोटच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील प्रकार; कच्च्या रस्त्यानेच आवागमन

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : घोट येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील नालीतील गाळाचा उपसा मागील चार वर्षांपासून करण्यात आला नाही. त्यामुळे पाऊस आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहते. पावसाचे पाणी सांडपाण्यात मिसळत असल्याने दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र या प्रकाराकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष आहे. पावसाळा सुरू झाला असतानाही पथदिवे लावले नाही. कच्च्या रस्त्यानेच नागरिकांना आवागमन करावे लागत आहे.
पावसाळ्यापूर्वी स्थानिक स्तरावर नाल्यातील गाळाचा उपसा करणे, पथदिवे लावणे तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. यासाठी विशिष्ट निधी ग्रा. पं. ला शासनाकडून मिळतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते.
घोट येथे मागील चार वर्षांपासून वॉर्ड क्रमांक ४ च्या नालीतील गाळाचा उपसा करण्यात आला नाही. या नालीलगतच बोअरवेल असून सभोवताल घाण पसरली आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय वॉर्डातील पथदिवे तीन महिन्यापासून बंद पडले आहेत. ग्रा. पं. ला याबाबत सूचना करूनही बदलण्यात आले नाही. वॉर्डात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ग्रामसभेत अनेकदा मुद्दा मांडण्यात आला. परंतु काहीच झाले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वॉर्ड क्रमांक ४ मधील समस्या सोडवावी, अशी मागणी प्रकाश सातार, प्रफुल राऊत, आकाश सातार, दिवाकर सरपे, रवी सातार, अजय सरपे, सुरेंद्र सातार, अतुल सातार, नितीन सातार, नागेश राऊत, अजय सातार यांच्यासह नागरिकांनी केली.

बीडीओंकडे तक्रार
घोट येथील वॉर्ड क्रमांक ४ येथील नालीतील गाळाचा उपसा चार वर्षापासून झाला नाही. स्थानिक प्रशासन या वॉर्डातील समस्या सोडविण्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी करीत प्रशासनाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे घोट येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Neglected mud sludge for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.