मूल्यमापन नियमांची जाणीव आवश्यक
By Admin | Updated: August 4, 2016 01:53 IST2016-08-04T01:53:13+5:302016-08-04T01:53:13+5:30
गावातील तंटे गावातच सोडवून शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू केलेल्या

मूल्यमापन नियमांची जाणीव आवश्यक
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा : तंमुसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन हवे
देसाईगंज : गावातील तंटे गावातच सोडवून शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना तंटामुक्त समितीच्या कार्याचे नेमके मूल्यमापन कसे होते. हे माहिती नाही. त्यामुळे तंमुसच्या पदाधिकाऱ्यांनी मूल्यमापनाचे सार जाणून घेण्याची व मूल्यमापनाच्या निकषाविषयी शासन व प्रशासनामार्फत व्यापक मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.
तंटामुक्त समितीचे पदाधिकारी निरपेक्ष भावनेने कार्य करीत असले तरी मूल्यमापनाची तांत्रिक बाजू समजून न घेतल्यास पदरी निराशाच पडते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी मूल्यमापनाचे सार समजून घेण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
सामाजिक सुरक्षिततेचे कार्यक्रम राबविण्यासाठी ५ गुण, गावामध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी ५ गुण, अनिष्ठ प्रथा रोखण्यासाठी ५ गुण, वैैयक्तिक समारंभातील अनिष्ठ चालीरिती प्रतिबंध घालण्यासाठी ५ गुण, नावीण्यपूर्ण उपक्रमासाठी ५ गुण आहेत. ३० सप्टेंबरपर्यंतचे दाखल तंटे मिटविण्यासाठी १०० गुण आहेत. महसूली व फौजदारी प्रकरणातील ९१ ते १०० टक्क्यापर्यंत तंटे सोडविल्यास ३५ गुण, ८५ ते ९० टक्के तंटे सोडविल्यास ३० गुण दिले जातात. दिवाणी प्रकरणात ९१ ते १०० टक्के तंटे सोडविल्यास २५ गुण तर ७६ ते ९० टक्के तंटे सोडविल्यास २० गुण मिळतात. मूल्यमापन नियमातील सर्व बारकावे माहिती असावे. (प्रतिनिधी)
७० टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य
तंमुसचे मूल्यमापन करताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ८० गुण, ३० सप्टेंबर पर्यंत तंट्याची सोडवणूक करण्यासाठी १०० व ३० सप्टेंबरनंतरचे तंटे सोडविण्यासाठी २० असे एकूण २०० गुण आहेत. या तिन्ही बाबींमध्ये स्वतंत्ररित्या किमान ७० टक्के गुण प्राप्त झाल्याशिवाय तसेच एकत्रित गुणांपैैकी किमान ७५ टक्के गुण मिळाल्याशिवाय ग्राम पंचायत तंटामुक्त अभियान पुरस्कारासाठी पात्र ठरत नाही.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ८० गुण आहेत. सार्वजनिक सण, उत्सव रचनात्मक पद्धतीने व शांततेने साजरे करण्यासाठी १० गुण आहेत. सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे संरक्षण करणे व विद्रुपीकरण रोखणे यासाठी १० गुण आहेत. यामध्ये शासकीय व सार्वजनिक मिळकतीवर अतिक्रमण होऊ न देणे याबाबीचा समावेश आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेसाठी १० गुण, अवैैध धंद्यांना प्रतिबंधासाठी १० गुण आहेत.