आदिवासींच्या सर्व जातींनी एकसंघ लढा देण्याची गरज
By Admin | Updated: January 17, 2016 01:21 IST2016-01-17T01:21:19+5:302016-01-17T01:21:19+5:30
महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण ४७ पोटजाती आहेत. यापैकी अनेक पोटजाती वेगवेगळ्या दिशेने आपल्या अधिकार ...

आदिवासींच्या सर्व जातींनी एकसंघ लढा देण्याची गरज
नीलकांत कुलसंगे यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत राज्यस्तरीय चर्चासत्र
गडचिरोली : महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण ४७ पोटजाती आहेत. यापैकी अनेक पोटजाती वेगवेगळ्या दिशेने आपल्या अधिकार व हक्कासाठी संघर्ष करीत असल्याचे दिसून येते. प्रसंगी एकमेकांच्याच विरोधातही भूमिका बजावीत असल्याचे विदारक चित्र आहे. आदिवासींमध्ये आपापसात फूट पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आदिवासींना सर्व घटनादत अधिकार मिळून त्यांचा विकास होण्यासाठी सर्व पोटजातींनी एकसंघ लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूरचे नाट्य दिग्दर्शक डॉ. नीलकांत कुलसंगे यांनी केले.
आदिवासी सोशल फोरम महाराष्ट्र, बहुजन संघर्ष व अखिल भारतीय आदिवासी महासभा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार स्व. नेताजी राजगडकर यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त ‘आदिवासींची स्थिती व आव्हाने’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी येथील गोंडवाना कला दालनात झाले, यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हिरामण वरखडे तर प्रमुख अतिथी म्हणून अंजली राजगडकर उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. कुलसंगे म्हणाले, पूर्वी एकसंघ आदिवासींचा विचार व उल्लेख केला जात होता. मात्र आता प्रत्येक राजकीय पक्षात आदिवासींचे पदाधिकारी असल्याने पोटजातीचा उल्लेख होताना दिसून येत आहे. आदिवासी समाजातील विविध पोटजातीत अनेक राजकीय पुढारी आहेत. काही सत्तापक्षात तर काही विरोधी पक्षात आहेत. मात्र काही अपवाद वगळता बहुतांश आदिवासी पुढारी तसेच लोकप्रतिनिधी समाजनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेलाच अधिक महत्त्व देत असल्याची खंत डॉ. कुलसंगे यांनी व्यक्त केली.
एकसंघ राहून सर्व आदिवासींनी संघर्ष केल्यास शासन व प्रशासनही त्यांच्यापुढे झुकेल, यातून आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार व हक्क मिळून विकास होण्यास मदत होईल. आदिवासींच्या शैक्षणिक धोरणासंदर्भात विशेषकरून आश्रमशाळा व आदिवासींच्या सर्व योजनांबाबत सखोल विचार करण्याची गरज आहे. असेही कुलसंगे म्हणाले. यावेळी माजी आ. हिरामण वरखडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभू राजगडकर यांनी केले तर संचालन व आभार राजेंद्र मरसकोल्हे यांनी केले.