दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:27 IST2025-12-08T12:25:35+5:302025-12-08T12:27:32+5:30
नागपूरवरून काम आटोपून हिंगे दांपत्य आपल्या कारने गडचिरोलीकडे जात होते. पाचगाव जवळून जात असताना दुभाजक ओलांडून आलेल्या एका वाहनाने त्यांच्या कारला मागून जोरात धडक दिली.

दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी
गडचिरोली : आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी (अजित पवार) महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता सुशील हिंगे (वय ५३) यांचा रविवारी (७ डिसेंबर) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. पती सुशील हिंगे (वय ५७) गंभीर जखमी आहेत. गडचिरोली-नागपूर महामार्गावरील उमरेड तालुक्यातील पाचगावजवळ घडलेल्या या दुर्घटनेने गडचिरोलीत शोककळा पसरली आहे.
नागपूर येथील काम आटोपून हिंगे दांपत्य आपल्या कारने गडचिरोलीकडे परतत होते. रविवारी रात्री उशिरा पाचगाव जवळून जात असताना साडेबारा वाजता दुभाजक ओलांडत आलेल्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या कारला मागून भीषण धडक दिली.
धडकेत मधल्या सीटवर बसलेल्या गीता हिंगे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली. सुशील हिंगे आणि वाहनचालक हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गीता हिंगे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता कठाणी नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोरोना संकटात गरजूंना मदत…
गीता हिंगे सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत काम करत होत्या. आधार विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात त्यांनी अक्षरशः शेकडो रुग्णांसाठी घरगुती अन्नाचे डबे पोहोचवले; मृत्यू झालेल्या रुग्णांच्या घरात जायला नातेवाईकही घाबरत असताना अंत्यसंस्काराची जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली.
विधवांसाठी मकरसंक्रातीला आयोजित केलेला हळदी-कुंकू कार्यक्रम हा तर त्यांच्या समाजकार्यातील संवेदनशीलतेचा मोठा दाखला. समाजाने या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हे त्यांचे वाक्य आजही अनेकांना आठवते.
नाराजीनाट्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपमध्ये महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, जिल्हा महामंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवताना त्यांनी अनेक महिला कार्यकर्त्यांना राजकारणात स्थान निर्माण करून दिले.
नगरपालिका निवडणुकीतील नाराजीनाट्यानंतर भाजपला रामराम करत त्यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मित्रपक्ष राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. प्रवेश होताच त्यांची निवड महिला प्रदेश उपाध्यक्षा पदी झाली. राजकारणात नेतृत्वगुण व सामाजिक भान ठेऊन काम करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.
-----