गडचिरोलीत बांधकामावरील वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 19:14 IST2022-06-30T19:11:46+5:302022-06-30T19:14:01+5:30
Gadchiroli News भामरागड तालुक्यातील विसामुंडी गावाजवळील नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर असलेल्या पाच वाहनांना नक्षलवाद्यांनी रात्रीच्या सुमारास आग लावली.

गडचिरोलीत बांधकामावरील वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील विसामुंडी गावाजवळील नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर असलेल्या पाच वाहनांना नक्षलवाद्यांनी रात्रीच्या सुमारास आग लावली. यावेळी बांधकामाजवळ पाल टाकून राहात असलेले दोन चालक आणि एका दिवाणजीला जबर मारहाण करण्यात आली. जखमींना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विसामुंडी येथे रात्री १० वाजतानंतर २५ च्या संख्येतील नक्षली आले आणि त्यांनी नाल्यावरील पुलाच्या बांधकामस्थळी जाऊन चालकांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी उठण्यास वेळ केल्यानंतर नक्षल्यांनी त्यांना मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये पवन लसमय्या रतपल्लीवार (रा. येचली, ता. भामरागड), रघुपती बापू नैताम (रा. जिंजगाव, ता. भामरागड) आणि शंकर फागू राणा (रा.ओरपरता (झारखंड) यांचा समावेश आहे. यानंतर त्या कामावर असलेला एक जेसीबी, एक पोकलॅन, दोन ट्रॅक्टर आणि एक दुचाकी नक्षल्यांनी पेटवून दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.