मंत्री वडेट्टीवार, शिंदेंवर नक्षल्यांची आगपाखड, खाणींच्या लीजवरुन दुटप्पीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 11:37 IST2021-11-11T11:25:19+5:302021-11-11T11:37:59+5:30

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुरजागड लोहखाणीविरुद्ध त्या भागातील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्याचा बहाणा करून पाठ फिरविली असा आरोप माओवाद्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

Naxals reaction on Minister vijay wadettiwar and eknath Shinde over surajgarh mining projects | मंत्री वडेट्टीवार, शिंदेंवर नक्षल्यांची आगपाखड, खाणींच्या लीजवरुन दुटप्पीपणाचा आरोप

मंत्री वडेट्टीवार, शिंदेंवर नक्षल्यांची आगपाखड, खाणींच्या लीजवरुन दुटप्पीपणाचा आरोप

गडचिरोली : जिल्ह्यातील लोहखाणींची लीज आणि खाणींविरोधातील आंदोलन या विषयाला हात धरून भाकपा(माओवादी) पश्चिम ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने काढलेल्या पत्रकात सत्तापक्षातील मंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली आहे.

खाणींविरोधातील आंदोलनात सहभागी होण्यावरून वडेट्टीवार यांना तर, लोहप्रकल्प उभारण्यावर ठाम असण्यावरून शिंदे यांना त्याने लक्ष्य केले. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातच लोहखाणीची लीज देण्यात आली. भाजप-शिवसेनेच्या सरकारने अन्य कंपन्यांना लीज वाटप केली. त्यामुळे वडेट्टीवार आणि त्यांचा काँग्रेस पक्ष सुरजागड खाण बंद करण्याचा आदेश का देत नाही? असा सवाल प्रवक्ता श्रीनिवासने पत्रकातून केला आहे.

कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगून वडेट्टीवार यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली हा बहाणा होता, असा आरोप त्यांनी केला. हे पत्रक सोशल मीडियावर फिरत असले तरी ते नक्षल्यांकडून जारी झाले किंवा नाही याबाबतची सत्यता कळू शकली नाही. 

शिंदेंना धमकी दिलीच नाही?

काही दिवसांपूर्वीच राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना माओवाद्यांनी ठार मारण्याची धमकी दिल्याचे पत्र आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, अशाप्रकारची धमकी माओवादी पार्टीकडून (नक्षल्यांकडून) दिलेलीच नाही. ती तथाकथित धमकी म्हणजे स्टंटबाजी असून त्याचा आम्ही निषेध करतो, असे पत्रक भाकपाचा(माओवादी) पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने काढले आहे. दरम्यान, शिंद यांना धमकीचे पत्र नेमके कुठून आले याचा तपास अजून सुरुच असल्याचे समजते.  

Web Title: Naxals reaction on Minister vijay wadettiwar and eknath Shinde over surajgarh mining projects