'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप!
By संजय तिपाले | Updated: October 28, 2023 17:42 IST2023-10-28T17:40:53+5:302023-10-28T17:42:36+5:30
नक्षल्यांनीही तेलगू भाषेत पत्रक काढून मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.

'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप!
गडचिरोली : महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणावरील पुलाचे तीन खांब खचल्याने तेलंगणात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारण तापले आहे. काँग्रेस व भाजपने केसीआर सरकारवर टीकेची झोड उठवली असताना आता नक्षल्यांनीही तेलगू भाषेत पत्रक काढून मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचाजवळील मेडीगड्डा धरणावरील पुलाचे तीन खांब खचल्याचा प्रकार २१ ऑक्टोबरला रात्री घडला होता. त्यानंतर तातडीने तेलंगणा सरकारने महाराष्ट्राला जोडणाऱ्या एक किलोमीटरच्या पुलावरील वाहतूक बंद करून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला. या घटनेचा शोध घेण्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने महराष्ट्रातील सिरोंचा तालुक्याला याचा फटका बसला. सिरोंचा तालुक्यातील २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांचे कृषीपंप, शेतीसाहित्य वाहून गेले. अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेकांची शेती बुडाली, काही जनावरे वाहून गेली. यामुळे धरणाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले आहे.
तेलंगणात सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याविरोधात विरोधकांना आयते कोलित मिळाले. काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी.किशन रेड्डी यांनीही केसीआर सरकारवर प्रहार केला. आता या वादात नक्षलवाद्यांनी उडी घेतली असून त्यांनी तेलुगुतून एक पत्रक काढले आहे. समाजमाध्यमावर सार्वत्रिक झालेल्या या पत्रकात नक्षल्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या सिंचन प्रकल्पात मोठे कमिशन घेतल्याचेही म्हटले आहे.
...म्हणून तेव्हा पोलिस बंदोबस्त
धरणाच्या बांधकामावेळी गैरव्यवहार लपविण्यासाठी केसीआर सरकारने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. माध्यमांना देखील धमकवण्यात आले. आज या बांधकामाला तडे जात असल्याने घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात यामुळे होणाऱ्या नुकसानीला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जबाबदार राहतील असेही पत्रकात नमूद आहे. हे पत्रक तेलंगणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.