पोलीस पाटलाची नक्षलवाद्यांकडून हत्या; गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 10:39 IST2022-05-25T10:36:49+5:302022-05-25T10:39:14+5:30
ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही.

पोलीस पाटलाची नक्षलवाद्यांकडून हत्या; गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील घटना
एटापल्ली (गडचिरोली) : गावातील तेंदूपत्ता फळीवर मुन्शी (दिवाणजी) म्हणून काम पाहात असलेल्या पोलीस पाटलाचे रात्री अपहरण करून नक्षलवाद्यांनी मंगळवारच्या पहाटे धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. हे हत्याकांड एटापल्ली तालुक्यातील दोडूर या गावात घडले. कुल्ले वज्जा कौशी (५५ वर्षे) असे मृत पोलीस पाटलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, हेडरी उपविभागांतर्गत गट्टा उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोडूर गावात सध्या तेंदूपत्ता हंगाम जोमात सुरू आहे. या फळीवर काम पाहत असताना कुल्ले कौशी यांना रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सोबत नेले. जंगलात त्यांची हत्या करून पहाटे त्यांचा मृतदेह गावाबाहेर आणून टाकला. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही. दुपारी मृतदेह शवविच्छेदनासाठी एटापल्लीत आणण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.