गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून दोन जणांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 16:20 IST2018-09-02T16:19:53+5:302018-09-02T16:20:17+5:30
नक्षलवाद्यांनी रविवारी (2 सप्टेंबर) मध्यरात्री छत्तीसगडमधील दोन जणांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली.
_201707279.jpg)
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून दोन जणांची निर्घृण हत्या
एटापल्ली (गडचिरोली) : नक्षलवाद्यांनी रविवारी (2 सप्टेंबर) मध्यरात्री छत्तीसगडमधील दोन जणांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. त्यांचे मृतदेह एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) उपपोलीस ठाण्यापासून एक किमी अंतरावरील ताडगुडा मार्गावर रविवारी (2 सप्टेंबर) सकाळी आढळून आले. सोनू पदा(३५) व सोमजी पदा(४०) दोघेही (बांदे, छत्तीसगड) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही पोलिसांचे खबऱ्या असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी रात्री सोनू पदा व सोमजी पदा यांच्या गावी गेले. त्यांना झोपेतून उठवून गावाबाहेर आणले. उलिया हे गाव महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. दोघांनाही महाराष्ट्राच्या हद्दीतील गट्टा गावाजवळ आणले.
गट्टा येथे उपपोलीस स्टेशन आहे. उपपोलीस स्टेशनपासून उत्तरेस एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडगुडा मार्गावर दोघांचीही हत्या केली. रविवारी (2 सप्टेंबर) सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळून आले. मृतदेहाजवळ नक्षल्यांनी पत्रक टाकले आहे. या पत्रकात त्या ते २०१६ पासून पोलिसांचे खबऱ्या म्हणून काम करीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.