२२ ग्रामपंचायतींचा नक्षल गावबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:32+5:30
विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट अंतराचा नियम पाळून ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे, कोणत्याही प्रकारची त्यांना मदत न करण्याचे ठरविले. याशिवाय प्रशासनाने किष्टापूर नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरू ठेवून हे काम लवकर पूर्ण करावे, असे ठरावात म्हटले आहे.

२२ ग्रामपंचायतींचा नक्षल गावबंदीचा ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या ८ एप्रिल २०२० रोजी अहेरी तालुक्यातील किष्टापूर नजीकच्या नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला विरोध करत नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराची वाहने जाळली होती. या कृत्याचा पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींनी तीव्र निषेध नोंदविला होता. आता देचलीपेठा पंचक्रोशीतील २२ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन नक्षल गावबंदीचा ठराव एकमताने मंजूर करत नक्षली कारवायांना स्पष्ट विरोध दर्शविला आहे.
विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट अंतराचा नियम पाळून ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे, कोणत्याही प्रकारची त्यांना मदत न करण्याचे ठरविले. याशिवाय प्रशासनाने किष्टापूर नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरू ठेवून हे काम लवकर पूर्ण करावे, असे ठरावात म्हटले आहे. सदर पुलाच्या बांधकामासाठी ग्रामस्थ स्वत: पुढाकार घेत प्रशासनाला मदत करतील, अशी ग्वाहीही ठरावातून देण्यात आली. स्वत:च्या फायद्यासाठी जनतेचा वापर करून घेणे नक्षलवाद्यांनी तत्काळ थांबवावे व जनतेच्या विकासाच्या आड येऊ नये, असा इशाराही या २२ ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना दिला आहे. नक्षल गावबंदीचे ठराव संमत करणाऱ्या १६ ग्रामपंचायतींचे ठराव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येणार आहे. महाराष्टÑ शासनाच्या निर्णयानुसार सदर गावांच्या विकासासाठी प्रत्येकी सहा लाख रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून मंजूर करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. नक्षल गावबंदीचे ठराव पारित करणाºया गावांमधील ग्रामस्थांच्या कृतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्वागत केले.
पूल बांधकामासाठी ग्रामस्थ आग्रही
किष्टापूर नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा फायदा देचलीपेठा परिसरातील हजारो ग्रामस्थांना दळणवळणासाठी होणार आहे. याची जाणीव या भागातील नागरिकांना आहे. पावसाळ्यात सदर नाल्याला पूर आल्यानंतर या भागातील गावांचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. परिणामी शालेय विद्यार्थी, मजूर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आदींची दळणवळण व्यवस्था पूर्णत: बंद होते. उपचाराअभावी नागरिकांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. या सर्व बाबींचा विचार करता किष्टापूर नाल्यावर पुलाचे बांधकाम होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हे बांधकाम पूर्ण करून घेण्यासाठी या भागातील नागरिकही कमालीचे आग्रही आहेत.
पुलाचे काम पूर्ण होईलच- बलकवडे
नक्षलवाद्यांनी किष्टापूर नाल्याच्या पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर सदर पुलाचे काम बंद पडले. देचलीपेठा परिसरातील २२ ग्रामपंचायतींनी नक्षल गावबंदीचा ठराव केल्याने अशा गावांच्या विकासासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव पाठीशी राहील. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पोलीस दल पूर्ण प्रयत्न करेल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ग्रामस्थांना दिले.
गावबंदीसाठी या गावांचा पुढाकार
नक्षलवाद्यांनी कोणत्याही बाबीचा विचार न करता केवळ स्वत:च्या फायद्यासाठी किष्टापूर नाल्याच्या पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये नक्षल्यांप्रती आजही असंतोष आहे. त्यामुळे देचलीपेठा परिसरातील दोडगीर, शेडा, आसली, मुखनपल्ली, बिºहाडघाट, कोंजेड, येलाराम, कामासूर, मुत्तापूर, तोडका, मिट्टीगुडम, पेठा, जोगनगुडा, कोडसापल्ली, देचलीपेठा, सिंधा, किष्टापूर, पेरकाभट्टी, दोडगीर, पत्तीगाव, लखनगुडा, शेडा आदी २२ ग्रामपंचायतींनी नक्षल गावबंदीचा ठराव पारित केला.