Navodaya created high quality students | नवोदयने उच्च दर्जाचे विद्यार्थी घडविले
नवोदयने उच्च दर्जाचे विद्यार्थी घडविले

ठळक मुद्देवाय.आर.जॉन्सन यांचे प्रतिपादन : घोट येथील माजी विद्यार्थी मेळाव्यात खासदारांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातून विद्या प्राप्त करून अनेक विद्यार्थी घडले आहेत. देशात व विदेशात उच्च पदावर कार्यरत असलेले उच्च दर्जाचे विद्यार्थी या शाळेने घडविले असून असे विद्यार्थी घडविण्याचे काम सुरूच आहे, असे प्रतिपादन डॉ.वाय.आर.जॉन्सन यांनी केले.
स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयात ८ डिसेंबर रोजी रविवारला माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून खा.अशोक नेते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य नागेश्वरराव उपस्थित होते. याशिवाय भाजपचे पदाधिकारी प्रकाश गेडाम, स्वप्नील वरघंटे, ज्येष्ठ शिक्षक राजन गजभिये, घोटचे सरपंच विनय बारसागडे, नवोदय पालक समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश साखरे, श्यामराव कोरेटी, अभय नन्नावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन १९८७ ला स्थान झालेले जवाहर नवोदय विद्यालयात सुरूवातीला प्रचंड अडीअडचणी होत्या. अनेक अडचणीतून हे विद्यालय पुढे आलेले आहे. त्यात माजी प्राचार्य म्हणून सन १९९२ ते १९९६ या कालावधीत डॉ.जॉन्सन यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळून येथील शिक्षणाचा दर्जा उंचावला. त्यामुळे डॉ.जॉन्सन यांना कन्याकुमारी येथून विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमाला बोलाविण्यात आले होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांचा शाल, श्रीफळ देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नेस्मो, नवोदय एक्स स्टुडंट, मल्टी पर्पज ऑर्गनायझेशनच्या वतीने या शाळेतील ३१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जवाहर नवोदय विद्यालयाच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरू असून जोपर्यंत या शाळेच्या समस्या पूर्णत: मार्गी लागत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक हितेश परमार, संचालन धीरज खोब्रागडे यांनी केले तर आभार उमाकांत पिपरीकर यांनी मानले.

शिबिरात २४ माजी विद्यार्थ्यांनी केले रक्तदान
घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिरात या शाळेच्या २४ माजी विद्यार्थ्यांनी स्वच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. यामध्ये रक्तदात्यांमध्ये डॉ. प्रणव आखाडे, डॉ. जयंत पर्वते, डॉ. स्नेहा पर्वते, डॉ. सचिन मडावी, डॉ. चंद्रशेखर श्यानगोंडा, अरूण सिडाम, प्रा. राकेश चडगुलवार, आशिष सोरते, परीक्षित दुर्गे, श्रद्धा नैताम, दीपक पुंगाटी, राजू मडावी, स्वप्नील भोवरे, कर्मा खोब्रागडे, धीरज निशाने, सुनील खोब्रागडे, मनोज झाडे, अतुल फुलझेले व सूरज कोडाप आदींचा समावेश आहे. शासकीय रक्तपेढीला ३० बॅग रक्त प्रदान करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा संक्रमण अधिकारी डॉ. अंजली साखरे, डॉ.यशवंत दुर्गे, अनिल तिडके, जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सतीश तडकलावार यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.

Web Title: Navodaya created high quality students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.