वैनगंगेत होणार जलवाहतूक
By Admin | Updated: April 2, 2015 01:48 IST2015-04-02T01:48:11+5:302015-04-02T01:48:11+5:30
केंद्र सरकारच्या जलवाहतूक योजनेत महाराष्ट्रातील १० नद्यांचा समावेश केला आहे.

वैनगंगेत होणार जलवाहतूक
गडचिरोली : केंद्र सरकारच्या जलवाहतूक योजनेत महाराष्ट्रातील १० नद्यांचा समावेश केला आहे. यात भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा समावेश आहे. केंद्र सरकारने वैनगंगा नदीत जलवाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या नदीवर जलवाहतूक सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील प्रमुख नद्यांमध्ये जलवाहतुकीच्या दृष्टीने आराखडा तयार केला असून या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी देसाईगंज तालुक्यापासून आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यापर्यंत वाहते. पुढे ही नदी सिरोंचापर्यंत जाते. मात्र चपराळाजवळ ती वर्धा नदीला जाऊन मिळते. वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र गडचिरोली जिल्ह्यात जवळजवळ १०० हून अधिक किमी लांब आहे. या नदीला बारमाही पाणी राहू शकते. या नदीवर बंधारे बांधून पाणी रोखून धरल्यास या ठिकाणी जलपर्यंटन शक्य आहे. त्यामुळे यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. केंद्र सरकारने अलीकडेच देशातील जलपर्यटनाच्या दृष्टीने योग्य असलेल्या नद्यांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये वैनगंगा नदीचे नावही समाविष्ट आहे. त्यामुळे जलपर्यटनाचा प्रयोग लवकरच जिल्ह्यात सुरू होईल, अशी आशा आता जिल्हावासीयांना वाटू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
यापूर्वीच होता जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी वैनगंगा नदीत जलपर्यटन करण्याच्या दृष्टीने २००९-१० मध्ये प्रस्ताव तयार केला होता व तो राज्य सरकारकडे सादर केला होता. मात्र या प्रस्तावावर कोणताही विचार त्यावेळी झाला नाही. तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना मार्र्कं डा येथे नेऊन त्यांना जलपर्यटनाची माहितीही देण्यात आली होती. मार्र्कं डा महोत्सवाच्या निमित्ताने जलपर्यटनाची ही बाब समोर आली होती. मात्र तत्कालीन सरकारने याबाबत काहीही हालचाली न केल्याने हा प्रस्ताव थंडबस्त्यात पडून होता. आता केंद्र सरकारने यावर विचार सुरू केला आहे.
वैनगंगा नदीवर पाच बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे वैनगंगेचे पात्र पाण्याने भरून राहील. यावर जलवाहतूक सुरू करता येईल. जलवाहतुकीमुळे सर्वसामान्यांचा प्रवासाचा खर्चही वाचेल. कमी खर्चात प्रवास करता येईल. वैनगंगेचे २५० किमीवरून पाणी आंध्रात वाहून जात होते. त्यालाही पायबंद बसेल.
- अशोक नेते, खासदार, गडचिरोली
गडकरींनी दिले होते निवडणुकीत आश्वासन
वैनगंगा नदीत जलपर्यटन सुरू केले जाईल, असे आश्वासन गडचिरोली येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने वैनगंगा नदीची निवड केली आहे. या नदीपात्रात प्रत्येक १० किमी अंतरावर बसस्थानकाच्या धर्तीवर थांबे तयार केले जातील. तेथून प्रवाशांना घेऊन जलपर्यटन करून दिले जाईल. यातून रोजगार निर्मितीसुद्धा होईल, असा दावा ना. गडकरी यांनी केला होता. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला असला तरी आणखी तीन ते चार वर्ष या कामासाठी लागतील काय, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.