नाकावर रूमाल अन् चोरीचा मामला
By Admin | Updated: December 6, 2014 22:47 IST2014-12-06T22:47:06+5:302014-12-06T22:47:06+5:30
आरमोरी कृषी उत्पन्न समितीची उप बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथील धानगंजात शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथे मूत्रिघराची सुविधा नसल्याने व धान्याची आवक वाढल्याने

नाकावर रूमाल अन् चोरीचा मामला
शेतकरी अडचणीत : देसाईगंजच्या धानगंजात सारे आतबट्ट्यातील काम
महेंद्र चचाणे - देसाईगंज
आरमोरी कृषी उत्पन्न समितीची उप बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथील धानगंजात शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथे मूत्रिघराची सुविधा नसल्याने व धान्याची आवक वाढल्याने सर्व रस्ते बंद झाल्याने धान्यमंडीत लघुशंकेला जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी होऊन येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाकावर रूमाल लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच आता व्यापारी शेडमध्ये धान्याचे मोजमाप करीत असल्याने चोरांनाही सुगीचे दिवस या धान्यमंडीत आल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. आज शनिवारी दुपारी लोकमतने या भागात स्टिंग आॅपरेशन केले, त्यावेळी हा सारा धक्कादायक प्रकार समोर आला. बाजार समितीचे कर्मचारी मात्र कुणाचीही तक्रार नाही. तक्रार आली तर आम्ही हमालच काय कुणालाही कामावरच ठेवत नाही, असे सांगून मोकळे होण्याच्या तयारी असल्याचे दिसून आले आहे.
धान गंजात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दूरदूरून आलेले शेतकरी येथे मुक्कामी थांबून आपल्या धान्याची रखवाली करीत असल्याचे दिसून आले. महिनाभरापूर्वी या धान्यमंडीत सर्वच दलाल व व्यापाऱ्यांकडे इलेक्ट्रॉनिक्स काटे लागले आहे. पूर्वी बाहेर होणारा धान्याचा काटा आता शेडमध्ये होत आहे. शेतकऱ्यांचा माल आतमध्ये घेतल्यावर त्यात पाला केला जातो व काट्यावर नेईपर्यंत पोत्यातील बरेच धान्य खाली पडून त्याचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे, असे दिसून आले.
या बाजार समितीत शेतकऱ्यांना राहण्यासाठी कुठलिही निवासी व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याचीही चांगल्या दर्जाची व्यवस्था नाही. बाजार समितीच्या आवाराकडे येणाऱ्या रस्त्यांवर धान्याचे पोते असल्याने अनेक शेतकऱ्यांना बाहेर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे बाजार समितीचे मैदान सध्या लघुशंकेचे ठिकाण झाले आहे. येथे प्रचंड दुर्गंधी पसरून आहे. गंजातील हमाल शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत झाडनच्या रूपात धानाची विल्हेवाट लावत आहे. हे झाडलेले धान नंतर बाहेर नेऊन विकले जातात. येथूनच चोरीला पाय फुटत आहे, असे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.