हत्ती कॅम्पमधील ‘आदित्य’च्या मृत्यूचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:26+5:30
सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, उपविभागीय वनाधिकारी एस. एस. पवार, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी यांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. मात्र मृत्यूचे सविस्तर कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदनादरम्यान काढण्यात आलेले अवयव फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कमलापूरचे वन परिक्षेत्राधिकारी जे. व्ही. घुगे यांनी कळविले.

हत्ती कॅम्पमधील ‘आदित्य’च्या मृत्यूचे गूढ कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या कमलापूर वन परिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमध्ये आदित्य या हत्तीचा मृत्यू होण्याची घटना सोमवारी (दि.२९) घडल्यानंतर या घटनेमागील कारणांचे गूढ वाढले आहे. ते उकलण्याचे आव्हान वन विभागासमोर निर्माण झाले आहे. सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्यावर हत्तीकॅम्प परिसरातच अग्निसंस्कार करण्यात आले.
सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, उपविभागीय वनाधिकारी एस. एस. पवार, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी यांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. मात्र मृत्यूचे सविस्तर कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदनादरम्यान काढण्यात आलेले अवयव फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कमलापूरचे वन परिक्षेत्राधिकारी जे. व्ही. घुगे यांनी कळविले.
गेल्या १० जून रोजी मुसळधार पावसानंतर कॅम्पजवळच्या तलावात गाळ साचल्याने त्या गाळात आदित्य अडकला होता. वन कर्मचारी व माहुतांनी दुसºया दिवशी पहाटे त्याला बाहेर काढले. मात्र बाहेर निघण्यासाठी आदित्यने रात्रभर केलेल्या संघर्षामध्ये तो पूर्णपणे थकून गेला होता आणि त्यामुळे त्याची मानसिक स्थितीही ठिक नव्हती. त्याच्यावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, नागपूर येथील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चित्रा राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाºयांनी दिनांक २९ पर्यंत औषधोपचार केले. मात्र त्या उपचारांना आदित्यने प्रतिसाद दिला नाही. हत्ती कॅम्प परिसरात मोठा खड्डा पडून आणि त्यात लाकडे टाकून आदित्यवर अग्निसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी असणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
पचनक्रिया मंदावल्याने आदित्यचा मृत्यू?
कमलापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन खेमलापुरे, एटापल्लीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गव्हाणे, अहेरी पंचायत समितीचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन पावडे यांच्यामार्फत आदित्यच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात चयापचय क्रिया मंदावल्याने शरीरातील इतर अवयवांवर ताण येऊन आदित्यचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला.