रंगभूमीतून होणार कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: October 21, 2014 22:52 IST2014-10-21T22:52:26+5:302014-10-21T22:52:26+5:30
लोककला व कलावंतांची खाण असलेली झाडीपट्टी रंगभूमी विविध नाटकांच्या माध्यमातून आपले नाव राज्यात गाजवायला सज्ज झाली आहे. दिवाळीपासून मंडई, शंकरपट, यात्रा, गळ यांच्या आयोजनाच्या

रंगभूमीतून होणार कोट्यवधींची उलाढाल
शा. मो. बारई - देसाईगंज
लोककला व कलावंतांची खाण असलेली झाडीपट्टी रंगभूमी विविध नाटकांच्या माध्यमातून आपले नाव राज्यात गाजवायला सज्ज झाली आहे. दिवाळीपासून मंडई, शंकरपट, यात्रा, गळ यांच्या आयोजनाच्या निमित्ताने प्रत्येक गावात झाडीपट्टींच्या नाटकांची रेलचेल असते. ही रेलचेल सुरू होण्यास आता प्रारंभ होणार आहे. दिवाळीनंतर झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांची खेड्यापाड्यात अधिक मागणी असते. त्यामुळे सहा महिन्यात अडीचशे कोटी रूपयापर्यंत आर्थिक उलाढाल झाडीपट्टी रंगभूमीमार्फत होत असते.
झाडीपट्टी रंगभूमीने मुंबईच्या चंदेरी जगालाही मोहित केल्याने चंदेरी दुनियेतील कलावंतांनीही झाडीपट्टी रंगभूमीकडे आपले पाय वळविले आहे. अनेक कलावंतांनी झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांमध्येही आपला डेरा बसविला आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये दिवाळीनंतर प्रत्येक गावांमध्ये नाटकाला सुरूवात होत असते. पूर्व विदर्भातील या चार जिल्ह्याच्या भागाला भौगोलिक परिस्थितीमुळे झाडीपट्टी या नावाने संबोधले जाते. झाडीपट्टीतील लोककला व संस्कृतीला १५० ते २०० वर्षाचा इतिहास लाभला आहे. झाडीपट्टी बोलीतून अनेक नाटक रंगमंचावरून तब्बल सहा महिने सादर केले जातात.
आॅक्टोबर महिन्यापासून मार्चपर्यंत झाडीपट्टीच्या प्रत्येक गावांमध्ये शंकरपट, गळ, यात्रा, मंडई गावकरी भरवित असतात. त्यानिमित्ताने प्रत्येक गावात एक पेक्षा अधिक नाटक असते. नाटकासह लोककलाही या सहा महिन्यात अनेक गावांमध्ये सादर होतात. यामध्ये दंडार, तमाशा, खडीगंमत, लावणी, दशावतारी आदींचा समावेश आहे. दिवाळीनंतर लोककलांना मंडई व शंकरपटाच्या माध्यमातून उधाण येत असते. झाडीपट्टीच्या अनेक कलावंतांनी केवळ झाडीपट्टीच नव्हे तर मुंबईसह दिल्लीचेही रंगपंच गाजवून आपली पात्रता सिद्ध केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध प्रदेशात तेथील मायबोलीसह विशिष्ट लोककला असल्या तरी सर्वात सरस म्हणून झाडीपट्टीच्या लोककलेकडे पाहिले जाते. त्याला कारणही वेगळेच आहे.
झाडीपट्टीतील सर्वात जुनी लोककला म्हणून दंडारीला स्थान आहे. नाटकाचे उगमस्थान दंडारीतूनच झाले, असा कयास आहे व ते सत्यही आहे. दंडारीत वेगवेगळे प्रवेश दाखविले जातात. त्यांना सोंग असे म्हटले जाते. सांगलीत ‘सीता स्वयंवर’ हे नाटक झाले असले तरी झाडीपट्टीत यापूर्वीच सोंगाच्या स्वरूपात अनेक नाटके गाजली. दंडारीतूनच झाडीपट्टीत नाटकांनी जन्म घेतला. मागील १५० वर्षापासून झाडीपट्टीत दंडार केली जात आहे.
पूर्वी दिवाळीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत मंडईचा हंगाम असायचा. प्रत्येक गावात नाटक, दंडार नागरिक सादर करायचे. काही ठिकाणी तर दुपारी दंडार व रात्री नाटक असेही समिकरण असायचे. स्थानिक कलावंतांना काम करण्याची संधी दंडार व नाटकाच्या माध्यमातून दिली जायची. त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीने अनेक कलावंत घडविले. त्यामुळे झाडीपट्टीला कलावंतांच्या निर्मितीची फॅक्ट्री संबोधले जाते. देसाईगंज येथे ३० ते ४० मंडळांमार्फत गावागावात नाटक सादर केले जात आहे. परंतु सध्य:स्थितीत नाटकात व्यावसायिकपणा आला आहे.