पशुवैद्यकीय चिकित्सालयाची कोट्यवधीची नवीन इमारत पाच वर्षांपासून धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:33+5:302021-04-24T04:37:33+5:30
आरमोरी : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आरमोरी येथे तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज अशी नवीन इमारत बांधली. येथे ...

पशुवैद्यकीय चिकित्सालयाची कोट्यवधीची नवीन इमारत पाच वर्षांपासून धूळ खात
आरमोरी : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आरमोरी येथे तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सुसज्ज अशी नवीन इमारत बांधली. येथे आजारी गुरांच्या तपासणीकरिता महागड्या नवीन मशिनरी व तपासणी यंत्रही पुरविण्यात आले. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त न निघाल्याने कोट्यवधीची इमारत व महागड्या मशिनरीही धूळ खात पडलेल्या आहेत. येथे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पशुचिकित्सालयाची सेवाही अस्थिपंजर झाली आहे.
पाळीव जनावरांवरील विविध आजारांचे निदान व्हावे, पशुपालकांना चांगली पशुवैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आरमोरी येथे १ कोटी ९२ लाख रुपये खर्चून तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची सुसज्ज नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात आली. इमारतीचे बांधकाम झाल्यावर या इमारतीमध्ये एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन व विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या करण्याकरिता तपासणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मशिनरी व तपासणी यंत्र हाताळणाऱ्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तज्ज्ञांअभावी मशिनरी व तपासणी यंत्राचा उपयोग काय? गुरांच्या विविध आजारांचे निदान कसे कळणार, असा प्रश्नही पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधीच्या इमारतीसोबतच लाखोंच्या मशिनरी धूळ खात पडल्या आहेत. आधीच रिक्त पदाने जर्जर असलेल्या तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा डोलारा एक पशुवैद्यकीय अधिकारी व एका शिपायावर सुरू आहे. इमारत बांधकाम होऊन पाच-सहा वर्षांचा कालावधी उलटला मात्र इमारतीचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. अनेकदा उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले. मात्र त्यावेळी आलेल्या आचारसंहिता व तांत्रिक कारणांमुळे उद्घाटनाला ब्रेक लागत गेला. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून सदर प्रशस्त इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून, कोट्यवधी रुपये खर्च करूनही इमारतीचा काहीएक उपयोग होत नसल्याने ती केवळ शोभेची वास्तू बनली आहे. कोट्यवधींची इमारत रिकामी पडून असेल तर बांधकाम करण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याकडे शासन, प्रशासन व पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
बाॅक्स...
कौलारू इमारतीतून कारभार
आरमोरी लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात आरमोरी, वघाळा, सायगाव, अरसोडा, शिवनी, रवी, मुलूरचक, पालोरा, शेगाव, आदी गावे येतात. आरमोरी शहर व परिसरातील गावांत पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गुरे व पशुपक्षी आजारी पडल्यास शेतकरी याच पशुचिकित्सालयात उपचारासाठी आणतात. मात्र नवीन इमारत होऊनही आजही पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा कारभार जुन्या लागून असलेल्या कौलारू इमारतीतून चालत आहे.
बाॅक्स
.. रिक्त पदामुळे सेवा अस्थिपंजर
आरमोरी येथील तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयात पाच पदे मंजूर आहेत; यांपैकी एक पशुधन विकास अधिकारी आणि एक शिपायाचे पद भरण्यात आले आहे. २०१५ पासून येथील साहाय्यक आयुक्त, वरिष्ठ लिपिक व वरणोपचाराचे पद रिक्त आहे. याशिवाय नवीन मशीनरी व तपासणी यंत्र हाताळण्यासाठी नव्याने टेक्निशियनची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पशु चिकित्सालयाच्या सर्व कामांची जबाबदारी एकटे पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर पराते यांच्यावर येऊन पडली आहे. त्यामुळे रिक्त पदाअभावी रुग्णालयाची सेवा अस्थिपंजर झाली आहे.