दारू विक्रेत्यांच्या घरासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:25+5:30

लांजेडा हा शहरातील मोठा वार्ड आहे. या भागात अनेक जण दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. परिणामी परिसरात सतत पुरुषांचा राबता असतो. अनेक ठिकाणी रस्त्यावरच दारू विकली जाते. रात्रीला तर लोक रोडवरच दारू पितात. याचा त्रास या भागातील लोकांना व खास करून महिलांना व युवतींना होतो. त्यामुळे या भागातील महिलांनी मुक्तिपथच्या सहकार्याने वार्ड संघटन तयार करून दारू विक्रेत्यांना आव्हान दिले.

Movement in front of liquor dealers' houses | दारू विक्रेत्यांच्या घरासमोर आंदोलन

दारू विक्रेत्यांच्या घरासमोर आंदोलन

Next
ठळक मुद्देलांझेडा वार्डात थाली बजाव । दारू विक्रीमुळे वार्डात वाढली गर्दी; कोरोनाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारूविक्री बंद होण्यासाठी शहरातील लांजेडा येथील वार्ड क्रमांक ४ मधील महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरासमोर शुक्रवारी ताट वाजवून अनोखे प्रतिकात्मक आंदोलन केले. महिलांच्या या गांधीगिरीमुळे विक्रेतेही खजील झाले होते.
लांजेडा हा शहरातील मोठा वार्ड आहे. या भागात अनेक जण दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. परिणामी परिसरात सतत पुरुषांचा राबता असतो. अनेक ठिकाणी रस्त्यावरच दारू विकली जाते. रात्रीला तर लोक रोडवरच दारू पितात. याचा त्रास या भागातील लोकांना व खास करून महिलांना व युवतींना होतो. त्यामुळे या भागातील महिलांनी मुक्तिपथच्या सहकार्याने वार्ड संघटन तयार करून दारू विक्रेत्यांना आव्हान दिले. अनेक अहिंसक कृती करून दारू उद्ध्वस्त केली. मोठी साठे नष्ट केले. काही विक्रेत्यांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. काहींना शिक्षा तर अनेकांवर दंडात्मक कारवाई झाली. असे असतानाही दारू विक्रेते दारूविक्री करीतच आहेत.
विक्रेत्यांना दारूविक्रीपासून परावृत्त करण्यासाठी शुक्रवारी महिलांनी अनोखे आंदोलन उभारले. विक्रेत्यांना खजील करण्यासाठी दारूविक्रेत्यांविरोधात ठाम उभ्या असलेल्या महिलांनी त्यांच्या घरासमोर जाऊन थाली बजाव आंदोलन केले. सात ते आठ विक्रेत्यांच्या घरासमोर ताट वाजवून माहिलांनी दारू विक्री बंद करण्याची प्रतीकात्मक मागणी केली. दारू विक्रीमुळे लांझेडा वार्डात इतरही धंद्यांना ऊत आला आहे.
दारू विक्रेत्यांमुळे वार्डात लोकांची गर्दी होते. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. परिणामी दारूविक्री तात्काळ बंद करण्याची मागणी महिलांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली. वार्डातील मानकाबाई मेश्राम, शशिकला मडावी, जोत्स्ना कुकुडकर, इंदिरा नैताम, मंदाबाई मडावी, शकुंतला सोमणकर, पुष्पा मेश्राम, वनिता टिकले, पार्वता गेडाम, अल्का नैताम, वंदना नैताम, कासुबाई नैताम, मालाबाई नैताम आणि लता नैताम यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

कारवाईचा इशारा
दारू विक्रेते करीत असलेली चूक त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी सर्वप्रथम शांततेने थाली बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दारू विक्रेत्यांची समाजात बदनामी झाली. या बदनामीमुळे खजील होऊन दारू विक्रीचा व्यवसाय सोडतील अशी अपेक्षा आहे. मात्र यानंतरही दारू विक्री सुरूच ठेवल्यास पोलिसांमार्फत सदर दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना तुरूंगाची हवा दाखविली जाईल, असा इशारा महिलांनी दिला.

Web Title: Movement in front of liquor dealers' houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.