मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST2021-07-17T04:27:51+5:302021-07-17T04:27:51+5:30
गडचिरोली : जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलाची दारू ...

मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात
गडचिरोली : जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून ती गावागावात पोहोचविली जात आहे.
अल्पवयीन वाहनचालक झाले सुसाट
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याेजनांची जागृती हवी
देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याचे दिसून येते.
प्रसूतिगृहात अपुऱ्या सुविधा
आरमोरी : तालुक्यातील काही उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह बांधण्यात आले आहेत. मात्र, हे प्रसूतिगृह अत्यंत लहान असून या प्रसूतिगृहांमध्ये आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना त्रास हाेत आहे.
अल्पवयीनांवर कारवाई करा
देसाईगंज : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
मुद्रा कर्जाचा लाभ नाही
काेरची : बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्यासाठी मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.
पर्जन्यमापक वास्तूची दुरुस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. नदीच्या काठावर असलेल्या सिरोंचा शहराला इंग्रजाच्या कालावधीपासून महत्त्व आहे.
डास व किटकांपासून आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नाल्या तसेच डबक्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी आहे.
वनहक्क प्रकरणे रखडली
सिरोंचा : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केला जातो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत.
राजोलीत अर्धवट पुलावरून प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
कुरखेडा येथे पार्किंगची व्यवस्था करा
कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.
कोरची विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. या विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास अधिकाऱ्यांसाठी सोयीचे हाेईल.
चुकीच्या पार्किंगमुळे अपघाताचा धाेका
गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने. वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे वाहतूक पाेलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
खताच्या ढिगाऱ्यामुळे डासांचे प्रमाण वाढले
गडचिरोली : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यामुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यांत जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी आरोग्य धोक्यात आले आहे.
हेमाडपंती शिवमंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भुयार जात असून तो भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते.
विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर
आष्टी : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विनाविमा धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गॅस सिलिंडर योजनेचा बट्ट्याबोळ
आरमोरी : वन विभागामार्फत नागरिकांना तसेच वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी दूरच्या गावात जावे लागते. गॅस सिलिंडर रीफिलिंग ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची मागणी
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
वीज चाेरांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीजचोरी केली जात आहे.
पाळीव डुकरांचा हैदोस वाढला
चामाेर्शी : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने स्वच्छतेबाबत माेहीम हाती घेतली नाही.
कव्हरेजअभावी माेबाइलधारक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. टाॅवर व भूमिगत केबल लाइनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.