माेबाईलसेवा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:34+5:302021-03-26T04:36:34+5:30
सिरोंचा : छत्तीसगड, आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले ...

माेबाईलसेवा कुचकामी
सिरोंचा : छत्तीसगड, आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग न आल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
दुर्गम भागात माेबाईल सेवा कुचकामी
आलापल्ली : आलापल्ली येथे बीएसएनएलकडून थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे मिळत आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जीप्रमाणे दिली जात आहे.
अनेक प्रभागांमधील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाले खाली गेले आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नाल्यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेही अच्छादन नसल्याने किरकोळ अपघात होत आहेत.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या दहनशेड मोडकळीस आल्या असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
मामिडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे तातडीने पूल बांधणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भीवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
पुलाअभावी वाहतूक होते वारंवार प्रभावित
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच ये-जा करावी लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती केव्हा होणार
गडचिरोली : सिंचाई विभागाने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधले आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
नागमाता मंदिराजवळ गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या मार्गाने भरधाव वेगाने वाहने जात असल्याने येथे गतिरोधक उभारावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहात असल्यामुळे रहदारी प्रभावित होत असून, वाहनचालकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नागाेबा देवस्थान दुर्लक्षित
गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.
मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
भामरागड तालुक्यात लाईनमनची पदे भरा
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते, परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एका लाईनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.
पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. ही अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
पर्यटनस्थळांचा विकास रखडला
कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत, पण त्या ठिकाणी अजूनपर्यंत सोयी-सुविधा नाहीत. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास पर्यटकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनस्थळे असतानाही केवळ शासनाची मान्यता व निधी मिळत नसल्याने त्यांची वाताहत आहे.
याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
गाळ उपशाअभावी नाल्या तुंबल्या
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी आहे. मागीलवर्षीच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. सध्या नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करावा, अशी मागणी हाेत आहे.
मका लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग
गडचिरोली : रबी हंगामातील हमखास व अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला ओळखले जाते. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या अनेक शेतकरी बियाण्यांची खरेदी करून मक्याची लागवड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढले असून, आता मका पीक जाेमात आहे. अनेक शेतकरी या पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत.